माणसाला माणूस जोडत जाण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे असल्याने साहित्यिकांचा व त्यांचा संबंध दृढ होई. ज्येष्ठ साहित्यिकांबद्दल त्यांना मोठा आदर वाटत असे. नवोदित लेखकांबद्दल त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होई. संगीत साहित्याच्या मैफलीत ते रसिकतेने समरस होत असत. अशा व्यक्तींमध्ये अनेक नामवंत व्यक्ती होत्या. साहित्यिक, राजकारणी, लेखक, समाजसेवक, पत्रकार, सरकारी नोकर, सामान्य जनता इत्यादी. यातील काही मान्यवर व्यक्तींचा फक्त उल्लेख त्यांनी त्यांच्या साहित्यात केला. विविध क्षेत्रांशी संबंधित अशा लोकांचे त्यांचे म्हणून असे एक स्वतंत्र सखोल, सर्वसमर्पित मत यशवंतरावांनी प्रकट केले आहे.
यशवंतरावांना साहित्यिकांबद्दलही आस्था होती. प्रसिद्ध साहित्यिकांपासून अगदी नवोदित साहित्यिकांपर्यंत आपले अभिप्राय स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांनी कळविले आहेत. लोकमान्य टिळकांच्या नंतर अखिल भारतीय पातळीवर महाराष्ट्राचे स्थान निर्माण करणारा त्यांच्यासारखा महाराष्ट्रीयन नेता अपवादानेच आढळेल. केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर अखिल भारतीय समाज जीवनाच्या संदर्भात सर्वांगीण विचार करणारे असे हे एक थोर व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या धोरणातील समतोल, त्यांच्या साधेपणात भरलेले आकर्षण, सदैव कार्यक्षम असलेले मन आणि मराठी मातीचे आकर्षण, हे त्यांचे गुण महत्त्वपूर्ण आहेत. यशवंतरावांच्या दीर्घ तपश्चर्येचे यथार्थ दर्शन पुस्तकाच्या माध्यमातून मराठी वाचकांना घडवावे या प्रबल विचाराने प्ररित होऊन मी हे पुस्तक लिहिण्याच्या कार्यास प्रारंभ केला. यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळी विविध विषयांवर जे मूलगामी व साहित्यिक विचार अनेक प्रसंगांच्या निमित्ताने व्यक्त केले आहेत ते चिरंतन स्वरूपाचे आहेत. लोकजीवन समृद्ध करण्यासाठी चांगल्या साहित्य निर्मितीची गरज आहे. याची त्यांना खात्री होती. समाजाची सांस्कृतिक जडणघडण करण्याची जबाबदारी त्यांनी साहित्यिकांवर टाकली होती. कोणत्याही देशाची ओळख पटते ती तेथे निर्माण होणार्या साहित्यकृतीमुळे ! भारत देश ओळखला जातो तो वेद, गीतांजली, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता या महान ग्रंथांमुळे. या गोष्टींवर त्यांचा पक्का विश्वास होता. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्याचे, देशात सामाजिक, सांस्कृतिक ऐक्य निर्माण करण्याचे काम त्यांनी साहित्यिकांवर सोपवले होते. त्यावरून त्यांचा साहित्यावरील आणि साहित्यिकांवरील अपार विश्वास प्रत्ययास येतो. तुलनेने आजचे चित्र तेवढे समाधानकारक नाही. एक राज्यकर्ता असूनही त्यांनी साहित्यिकांना जे मानाचे स्थान दिलेले होते ते उल्लेखनीय आहे.
यशवंराव चव्हाणांच्या सर्वस्पर्शी जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी साहेबांची स्वलिखित पुस्तके, आठवणी, आत्मचरित्र विविध ठिकाणी त्यांची झालेली भाषणे यांनी माझ्या मनात एकच गर्दी केली आणि त्यातूनच त्यांच्यातील साहित्यिकाने मला आपोआप आकर्षित केले. इतकेच नव्हे तर त्यांच्या साहित्यविचारांनी मला मोहित केले. मराठीच्या वाङ्मयउद्यानात विहार करणार्या या साहित्यिकाबद्दल व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मला उत्सुकता निर्माण झाली. त्यांच्या गतकाळातल्या अविस्मरणीय स्मृती, त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचे अभ्यास करणे गरजेचे वाटू लागले. भारताला ललामभूत ठरलेले श्री यशवंतराव चव्हाण यांचे यथार्थ दर्शन घडून त्यांच्यापासून प्रचलित तरुण पिढीस प्रेरणा मिळावी असे मला वाटते. यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संपन्न, सुसंस्कारीत रसिक, अभिजात होते. अशा व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे महत्त्वाचे वाटते. यशवंतरावांच्या साहित्याचा तरुण् पिढीला अभ्यास व संशोधन करण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून माझ्या मनात यशवंतरावांच्या कार्याचा, त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्याची उर्मी निर्माण झाली. यशवंतरावांचे राजकारण, साहित्यकारण व सामाजिक कार्य यावर अनेक अंगांनी समग्रतेने अभ्यास करण्याची गरज आहे. तसेच यशवंतरावांच्या जीवनातील विविध अंगांवर प्रकाश टाकताना काही उणिवा जाणवत गेल्या किंवा जेथे एकांगी विचार मांडला गेला तोही अभ्यासकाच्या भूमिकेतून मांडणे महत्त्वाचे वाटते. यशवंतरावांच्या समग्र साहित्याच्या वाचनानंतर जे आकलन झाले ते विषयवार मांडणे महत्त्वाचे वाटते. त्यांच्या विचारांचा, साहित्याचा आधार घेऊन त्यावर चिंतन करण्याची गरज वाटते. या लेखनामुळे त्यांच्या विचारसरणीची दिशा कळू शकेल. समाज हेच त्यांच्या विवेचनाचे मुख्य सूत्र असल्याचे सर्वप्रथम जाणवल्याशिवाय राहात नाही. एक अभ्यासू, वैचारिक व्यक्तिमत्त्व वाचकांशी हितगुज करत असल्याचे निदर्शनास येईल. कलावंताचे हात असलेला असा हा साहित्यिक विचारांची शिदोरी घेऊन वाचकांसमोर येतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व संवेदनशील असल्यामुळे त्यांनी साहित्यविषयक आपल निश्चित मते मांडली आहेत. मानवी जीवनातील प्रत्येक अंगावर साहित्याने प्रकाश टाकला पाहिजे. साहित्य हे देशाला मोठे करणारे असले पाहिजे. साहित्यिकांनी राष्ट्रीय जीवनाशी एकरूप व्हावे अशी त्यांची भावना होती. भारतीय विविधतेचा शोध घेऊन त्यातून भारतीयत्वाचा शोध घ्यावा व तो लोकांच्यापर्यंत पोचवावा अशी त्यांची साहित्यिकांकडून अपेक्षा आहे.