प्रकरण १५ - विचारशिल्प
ललित गद्यात्मक लेखन हा काही स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणता येणार नाही. गुजगोष्टी, लघुनिबंध, ललित निबंध या नावांनी ओळखल्या जाणार्या या वाङ्मय प्रकाराला 'ललित गद्य' असे नाव मिळाले आहे. तसेच समाजदर्शन, अध्यात्मचिंतन, तत्त्वचर्चा, व्यक्तिचित्रण, विनोदात्मकता, धर्मविचार, इतिहास, भाषा विषयाचा अभ्यास, साहित्य चर्चा इ. विविध हेतूसाठी या गद्याचा वापर करण्यात येत होता. यशवंतरावांनीही त्यांच्या काळात प्रबोधनाच्या आणि वैचारिक तत्त्वचर्चेच्या आविष्कारासाठी या गद्याचा वापर प्रामुख्याने केला. तशी या गद्याची प्रकृती पूर्णपणे आत्मनिष्ठ अशी असते. हे ललित लेखन वास्तवाच्या पातळीवर लेखकाने केले आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या अनुभवांचा त्या अनुभवातून झालेल्या संस्कारांचा तसेच त्या अनुभवातून लागलेल्या अन्वयार्थाचा परिपाक त्यांच्या या ललित गद्यात्मक लेखनात पाहावयास मिळतो. तसेच त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील विविध अनुभवांचे चिंतन व त्या चिंतनाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष अनुभव या ललितगद्यात्मक लेखामध्ये मांडले आहेत. यातूनच त्यांचे वैचारिक गद्यात्मक लेखन निर्माण झाले आहे. अशा या वैचारिक गद्यपरंपरेची पूर्वपीठिका समजून घेणे महत्त्वाचे असते.
ललित गद्य हा एक वाङ्मयाचा संमिश्र प्रकार म्हणून प्र.न. जोशी या वाङ्मयाचा उल्लेख करताना लिहितात, ''कोणत्याही बंदिस्त प्रकाराच्या चौकटीत सामावण्याची त्यांची तयारी नसते. विनोदी वाङ्मय, प्रवास वर्णने, शब्दचित्रे, व्यक्तिचित्रे लघुनिबंधाच्या धर्तीवरील ललित निबंधासारखे स्वैर लेख, आठवणी, संस्मरणे, पत्रात्मक वाङ्मय, नाट्यछटेसारखे आरक्षित प्रकार इत्यादींची नोंद करण्यासाठी अलीकडे ललित गद्य असा एक नवा साहित्यप्रकार स्थूलमानाने कल्पिला जाऊ लागला असून त्याच्या पोटात अनेक लहानमोठे उपप्रकार येऊन स्थिरावतात. ललित गद्य हा असा एक संमिश्र प्रकार आहे.'' कोणत्याही वाङ्मयप्रकारात न बसणारे असे ललित लेखन म्हणजे ललित गद्य अशी साधारण कल्पना आहे किंवा कोणतेही संस्करणाचे ओझे न घेता 'जे आहे तसे लिहावे' अशा विचारसरणीतूनच या गद्यात्मक लेखनाची निर्मिती झाली असावी. म्हणून कोणताही प्रकार नसलेला हा प्रकार मानला जातो. तसा तो मानला गेल्यामुळे मूळ अनुभवाला जो आकार तोच त्याचा आकार होऊन बसतो. लेखकाला प्रत्यक्ष जीवन जगत असताना, जे अनुभव आले त्या अनुभवांच्या आधारे ते जे लेखन करतात त्यास ललित गद्य म्हणता येईल. अशा सर्वसमावेशक ललित गद्य या ललित वाङ्मयप्रकारातील यशवंतरावांच्या निवडक लेखनाचा स्थूलपणे परिचय करून घेणे महत्त्वाचे आहे.
यशवंतराव चव्हाणांनी साधारणतः १९५० नंतरच्या काळात वैचारिक गद्यात्मक लेखन केले आहे. त्यांचे हे लेखन संग्रह स्वरूपात अजिबात आढळत नाही. त्यांनी जे लेखन केले ते मासिके, दिवाळी विशेषांक, वर्तमानपत्राच्या आवृत्या, स्मृतिग्रंथ, लोकराज्य यासारखे पाक्षिक इ. मध्ये छापले गेले आहे. संख्येने त्यांचे हे लेखन कमी असले तरी गुणांनी विशेष आहे. त्यांच्या या वैचारिक गद्य लेखनाने या वाङ्मयाच्या समृद्धीत भर घातली. स्वातंत्र्योत्तर काळात देशात अनेक आव्हाने निर्माण झाली. बदलत्या काळात ही आव्हाने स्वीकारण्यासाठी यशवंतरावांनी अनेक विषयांवर आपले मूलगामी विचार मांडले आहेत. धर्म, अर्थ, शिक्षण, संस्कृती, राजकारण, व्यापार, उद्योग, कला आणि साहित्य इत्यादी. या यशवंतरावांच्या स्वातंत्र्योत्तर काळातील वैचारिक साहित्यात कोणकोणत्या विचारांच्या लाटा आल्या आणि त्यांच्या या वैचारिक साहित्य लेखनाला कसकसा आकार मिळत गेला याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. यशवंतराव चव्हाणांच्या या वैचारिक गद्यवाङ्मयाने मराठीच्या ललित विचारप्रधान लेखनाची उंची वाढविली.
यशवंतरावांनी विचारांचे वेगवेगळे पैलू प्रकट करून वाचकांच्या जीवनदृष्टीला प्रगल्भता आणण्यासाठी तसेच त्यांना विचार प्रवृत्त करण्यासाठी हे लेखन केले आहे. यामध्ये 'संयुक्त महाराष्ट्राची साध्ये' - (संयुक्त महाराष्ट्र विशेषांक १९६०), 'सामाजिक जबाबदारी', (शतायुषी दिवाळी विशेषांक - १९८१), 'बांधिलकी कलम करता येत नाही' - ('पुस्तक पंढरी', दिवाळी विशेषांक १९८३), 'आज आणि उद्या' (सातारा, साप्ताहिक समर्थ १९४७), 'राष्ट्रीय ऐक्याची समस्या - (पुणे, केसरी दिवाळी अंक - १९६७), आजचे तरुण व सैनिकी शिक्षण, (यशवंत महाविद्यालय स्मृती ग्रंथ, नांदेड १९६३), 'माझ्या आयुष्यातील आशा निराशेचे क्षण', ('रविवार सकाळ पुणे, दिवाळी अंक १९७८), भारताची सद्यस्थिती (केसरी दिवाळी अंक पुणे १९६८), 'जीवनाचे पंचामृत', ('रविवार सकाळ' पुणे, दिवाळी अंक, पुणे १९७२), इत्यादी काही निवडक यशवंतरावांच्या वैचारिक गद्य लेखाचा विचार येथे केला आहे. हे सर्व लेख 'शब्दांचे सामर्थ्य' या ग्रंथात संपादित केले आहेत.