प्रा. बा. ह. कल्याणकर यांनी यशवंतरावांना अनेक वेळा पत्रव्यवहार केला. त्यांची अनेक पुस्तके त्यांनी यशवंतरावांकडे अभिप्रायासाठी पाठवली होती. त्यातील काही कलाकृतींना त्यांनी सुंदर असा अभिप्राय पत्राने कळवला तर काहींना त्यांनी स्पष्ट शब्दात नकार सुद्धा कळवला. ३ जून १९८० च्या पत्रात त्यांनी त्यांचा 'उठाव' हा काव्य संग्रह वाचला व तो त्यांना अतिशय आवडला म्हणून त्यांचे अभिनंदन करतात; तर 'जागल' या कविता संग्रहाबद्दल १ एप्रिल १९८२ च्या पत्रात त्यांनी सुंदर असा अभिप्राय पाठवला. ''तुमचा 'जागल' वाचला. ज्या ग्रामीण जीवनात तुम्ही वाढलात त्याचे इतके वास्तव आणि भावनाशील काव्यात झालेले व्यक्तिकरण मी प्रथमच पाहिले. कविता पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटल्या. पुन्हा वाचल्या म्हणजे अर्थ लक्षात येतो. कवितांचे जे समीक्षक आहेत त्यांनी तुमच्या कवितांचे समीक्षण केले की नाही माहीत नाही. त्या समीक्षकांची सर्व परिमाणे थिटी आहेत.... 'कृष्णाकाठ'चे लिखाण गतीने नाही तर संथ गतीने चालले आहे.... त्यांच्या 'दिशा आणि दृष्टी' या पुस्तकास यशवंतरावांनी प्रस्तावना नाकारली. त्या संदर्भातील १५ एप्रिल १९८३ च्या पत्रात लिहितात, ''तुमचे दि.९ एप्रिलचे पत्र आणि 'दिशा आणि दृष्टी' या पुस्तकाची मुद्रणप्रत मिळाली. मी हाती घेताच ती वाचून काढली. शिवाजीमहाराज व महात्मा फुले यांच्याबद्दलचे तुमचे लेख निरपवाद व उत्तम आहेत. परंतु चालू राजकीय परिस्थिती आणि त्यावरील तुमचे निदाने हे वाचल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की, तुमच्या पुस्तकावर मी प्रस्तावना लिहिणे हे अशक्य आहे. प्रस्तावना लिहायची म्हटली म्हणजे तुमच्या विचारावर सपाटून टीका करावी लागेल आणि अशा प्रस्तावना लिहिण्याची माझी इच्छा नाही. कारण मला तुमच्याबद्दल लोभ आहे व तुमच्या साहित्यगुणाबद्दल कौतुक आहे. स्पष्ट लिहिल्याबद्दल राग मानू नका, असेच प्रेम असू द्यावे.'' यशवंतरावांच्या पत्रातील हे विचार त्यांची या कलाकृतीबाबतची भूमिका स्पष्ट करतात.
मराठी माणसावर व महाराष्ट्राच्या मातीवरच यशवंतरावांचे प्रेम होते. कितीही कामाचा व्याप असला, ताण असला तरी मराठी साहित्यिक, विद्वान, कलावंत यांना ते स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र लिहित. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेत. त्यांना सहकार्य करत. डॉ. कोंडीबा गेनू कदम, राहणार वडशिंगे, ता.माढा, जि. सोलापून या छोट्याशा खेड्यातील व्यक्तीने पीएच.डी. च्या संशोधनासाठी आर्थिक मदतीसाठी पत्र पाठविले होते. त्यास त्यांनी ३१ मार्च १९७४ रोजी उत्तर लिहिले. त्या पत्रात ते लिहितात, ''तुमचे २३ मार्चचे पत्र मिळाले. तुम्ही पीएच.डी. साठी हिंदीत प्रबंध लिहित आहात हे वाचून आनंद वाटला. मुख्यमंत्र्यांच्या निधीतून काही मदत देता येईल की नाही याची मलाही शंका आहे. त्यामुळे श्री. नाईकसाहेबांना लिहिण्याबाबत मला माझाच संकोच वाटतो. परंतु व्यक्तिशः मी या कामासाठी थोडीफार मदत जरूर करू शकेन. पत्रोत्तराने सुचवा.'' यशवंतरावांनी शोषित, सर्वसामान्य लोकांच्या गरजेनुसार त्यांना आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक ती मदत केली. यावरून त्यांच्याकडे असलेला कणवेचा महापूर स्पष्ट दिसतो. ते कमी बोलत... चर्चेत, सभेत आणि सभागृहातही आवश्यक तेव्हाच बोलत. वृत्तपत्र प्रतिनिधींशी कमीच संपर्क ठेवत. पण आलेल्या पत्रांना मात्र तत्परतेने उत्तरे देत. अशा या पत्रातून त्यांच्या अनेकविध मनोभावांचे पैलू उघड होतात.
यशवंतरावांची पत्रे डोळ्याखालून घातली तर असे लक्षात येते की त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांना माणुसकी मिळवून देण्याकरिता खर्ची घातले. सर्वसामान्यांच्या हिताबरोबरच त्यांनी 'व्यक्ती' प्रमुख मानून त्यांना महत्त्व दिले. पत्रांमधून आपल्या परीने लोकांची समजूत घालून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्रव्यवहारातून यशवंतरावांच्या अंतर्मनात उठलेल्या भावलहरीचे हृदयंगम दर्शन घडते. त्यांच्या निर्मळ स्वभावाचे प्रतिबिंब अशा पत्रातून पाहावयास मिळते.
यशवंतराव चव्हाणांना अरुण शेवते यांनी अनेक पत्रे पाठवली. त्यांच्याकडे दिल्लीला जाऊन काही दिवस राहिलेसुद्धा. अमृता प्रीतमची त्यांनी मुलाखत घेतली. ते कवी, पत्रकार व लेखक असल्याने यशवंतरावांचा त्यांच्यावर लोभ होता. त्यांना २३ जुलै १९८४ रोजी पाठवलेल्या पत्रात लिहितात, ''तू जिज्ञासू व परिश्रमी आहेस. ज्याला सतत सर्जनशील जगायचे असते. त्याने असेच केले पाहिजे. तुझ्याबरोबर मी बाहेर फिरावयास आलो नाही याचे तुला दुःख होणे स्वाभाविक आहे. मी कुणाबरोबर कधीच फिरावयास गेलो नाही. अपवाद फक्त माझ्या पत्नीचा. मी काहीसा मोकळा असलो म्हणजे ती मला तिच्या बाजाराची ठिकाणे, पुजेची श्रद्धास्थाने व इतर महत्त्वाच्या जागा आग्रहाने नेऊन दाखवत असे. मलाही त्यात एक प्रकारचा आनंद होता. या प्रवासाखेरीज मी दिल्लीत फारसा भटकलो नाही आणि आज एकाकी फिरावयास जाण्याची माझी मनःस्थितीही नाही. त्यामुळे राग मानू नकोस.'' यशवंतरावांच्या आयुष्याचा अखेरचा कालखंड निराशा आणि दुःखे यांनी भरलेला दिसतो. अनेक संकटामागून संकटे आली. राजकारणातही अपयश येत गेले. कौटुंबिक जीवनातही अनेक आपत्ती आल्या. शत्रू-मित्रांनी केलेली जीवनघेणी टिंगलटवाळीही निर्धाराने सहन केली. त्यामुळे यशवंतरावांची शेवटची ५-१० वर्षे मोठी वादग्रस्त गेली. आयुष्यातल्या ज्या काळात आपल्या जीवनाशी सर्वप्रकारे एकरूप झालेल्या सहधर्मचारिणीच्या सोबतीची सर्वात जास्त आवश्यकता असते, त्याच काळात सौ. वेणूताईंचा मृत्यू झाला आणि यशवंतरावांचा आधार गेला.