• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

शैलीकार यशवंतराव ११०

यशवंतरावांनी व्हिएन्ना येथून २३ एप्रिल १९७२ मध्ये लिहिलेल्या पत्रात डॅन्यूबच्या खोर्‍याची सफर सांगताना त्याचे वर्णन ते असे करतात, ''डॅन्यूबचा काठचा हा प्रासाद दुर्ग आणि त्याच्या जवळून वाहणारी विशाल डॅन्यूब पाहून मन प्रसन्न झाले.  सुमारे दीड-दोन तास ही मोनॅस्ट्री आम्ही पाहात होतो.  नंतर मोटारबोटीवर चढून डॅन्यूब ओलांडली व डॅन्यूबच्या काठाकाठाने जाणार्‍या रस्त्याने परतीचा प्रवास सुरू केला.  नदीकाठाने निसर्गसौंदर्याने बहरून गेलेल्या या प्रदेशातून प्रवास करताना अनेक आठवणींनी मन भरून आले.  कवींनी व लेखकांनी वर्णिलेली मध्ययुगीन निळीभोर डॅन्यूब आज राहिलेली नाही.''  असे त्या प्रदेशाचे वर्णन केले आहे.  यशवंतरावांचे प्रवासात्मक लेखन हे दोन अंगांनी फुलत राहते.  त्याचे एक अंग असते तपशील पुरविणे हे; दुसरे अंग असते प्रवासात पाहिलेले, ऐकले, अनुभवले त्या संबंधी स्वतःला काय वाटले हे सांगणे.  तसेच आपल्या प्रवासलेखनात माहिती देण्याची आणि ती देताना, त्या संदर्भात काय वाटले ते सांगण्याची अशा दोन्ही जबाबदार्‍या स्वीकारल्या आहेत.  डॉ. वसंत सावंत लिहितात, ''प्रवासी लेखक जसा या वाङ्‌मयप्रकारात कलात्मकरीतीने दर्शन देतो, तितकाच त्याच्या प्रत्ययाला आलेला प्रदेशही सजीव व कलात्मक होऊन अवतरतो.  अशी किमया इतर कोणत्याही वाङ्‌मयप्रकारात घडत नाही.  प्रवासवर्णनातील प्रदेशाचे चालतेबोलते चित्र हा प्रवासवर्णन या वाङ्‌मयप्रकाराचा एक प्राणभूत घटक आहे.''  असेच वास्तववादी व चित्रणात्मक लेखन यशवंतरावांनी केले आहे.  

यशवंतरावांनी या देशात पाहिलेल्या वा अनुभवलेल्या गोष्टींशी स्वदेशातील त्यांच्या अनुभवाला आलेल्या, पाहिलेल्या गोष्टींशी सहज तुलना केली आहे.  लंडनपासून जवळपास साठ मैल दूर असलेल्या इंग्लंडच्या दक्षिण समुद्रकिनार्‍याची तुलना करताना लिहितात, ''समुद्रकिनार्‍यावर मैल नि मैल सुरेख रस्ता आहे.  एका बाजूला जुन्या विविध तर्‍हेच्या शानदार इमारतींची रांग आहे.  या रस्त्यांवरून जाताना मुंबईच्या मरीन ड्राईव्हची आठवण झाली.  या रस्त्यालाही येथे मरीन ड्राईव्हच म्हणतात.  परंतु दोन्हीमध्ये फरक फार जाणवला.  मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरही घाईगर्दी, गोंधळ एकीकडे आणि येथील प्रशांत वातावरण दुसरीकडे.  नवीन म्हणून का असेना हा मरीन ड्राईव्ह काही दिवस येऊन राहण्यासारखा वाटला.''  यशवंतरावांना परदेशात अनुभवाला येणारी प्रत्येक गोष्ट नव्याने जाणवत असल्याने त्यांच्या विचारशील व संवेदनाशील मनात काही भावनिक प्रश्न निर्माण होतात.  त्यामुळे हा लेखक प्रसंगी आत्मपरीक्षण करतो.  स्वतःच स्वतःला काही प्रश्न विचारत असतो आणि यातूनच पूर्वी पाहिलेल्या व अनुभवलेल्या गोष्टींची तुलना केली जाते.  या तुलनेच्या दृष्टीने यशवंतराव चव्हाणांनी 'बामियान' येथील भगवान बुद्धांचे दोन भव्य कोरीव पुतळे पाहिले.  येथील काही प्राचीन सांस्कृतिक लेणी पाहिली व सहजपणाने म्हटले आहे, ''त्या डोंगरकपारीत असंख्य लेखी आहेत.  त्यांच्या समोरून बामियान नदीचे पात्र जाते.  या दिवसात लहानसा प्रवाह आहे.  नदीच्या अलीकडच्या तीरावरून लेणी असलेली डोंगरभिंत पाहिली म्हणजे अजंठा-वेरूळची आठवण येते.  काही गुहांमध्ये अजंठासारखी चित्रेही असली पाहिजेत याचा पुरावा दिसतो.''  या स्वरूपाची सहज प्रतिक्रिया ते व्यक्त करतात.  

यशवंतरावांनी प्रदेश निरीक्षणाबरोबरच राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्‍न या प्रवासात्मक लेखनातून केला आहे.  यशवंतरावांनी ज्या देशांना भेटी दिल्या तेथील राजकीय डावपेचांचे चित्रण केलेले आहे.  तसेच तेथील जनतेची अवस्थाही चित्रित केली आहे, प्रेसिडेंट अयुबबद्दल स्पष्टपणे लिहितात, ''प्रेसिडेंट अयुबला व्यक्तिमत्त्व आहे.  उंचापुरा पठाण, चेहर्‍यावर नाटकी हास्य भरपूर.  बोलणेही अघळपघळ आणि गोड माणूस.  प्रामाणिक नाही वाटत.  चलाख वाटतो.  त्याच्या शब्दांवर भरवसा ठेवणे अवघड आहे.  नव्हे धोक्याचे आहे.''  असे सांगतात.  किंवा अमेरिकन सरकारचे धोरण भारताला अनुकूल नाही तेही मत तेवढ्याच निर्भीडपणे नोंदवतात.... ''सामान्यपणे अमेरिकन धोरण भारताला अनुकूल नाही.  त्यांच्यामध्ये किंतू आहे.  त्यांच्या अर्थमंत्र्यांना मी आज भेटलो.  त्यानंतरही माझ्या मनावर तोच परिणाम राहिला.  त्यांच्या जागतिक डावपेचांच्या आखाड्यामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान नाही.  मोठी काळजी वाहाण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यास हे लोक मागेपुढे पाहतील असे वाटत नाही.  फार सावधानतेने राहिले पाहिजे.''  अशा काही लेखनाच्या मागे यशवंतरावांच्या आत्माविष्काराची प्रेरणा ठळकपणे दिसते.  

यशवंतरावांच्या प्रवासवर्णनात्मक लेखनात अनेक लोकांची शब्दचित्रे, व्यक्तिचित्रे आली आहेत. प्रसंगपरत्वे यशवंतरावांचा परदेश दौर्‍यात परदेशातील उच्च अधिकारी, प्रथितयश व्यक्तींशी संबंध आला.  त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये भारतासंबंधी उदासीन कोण आहे, विरोधी कोण, सहानुभूती वगैरे कोणाची आहे याविषयी ते स्पष्टपणे लिहितात.  त्यामध्ये त्यावेळचे जागतिक बँकेचे अर्थसचिव मॅञफमार तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणातील पट्टीचे मुत्सद्दी किसिंजन वगैरेच्या संदर्भात मोजक्या शब्दांत लिहितात.  प्रवासात अनेक नमुन्याची व विविध स्वभाव विशेषांची माणसे भेटतात.  त्यामुळे त्यांच्या स्वभावाचे दर्शन प्रवास वर्णनात होते.  त्यांच्या या पत्रात्मक लेखनातून राजकीय स्थितिगतीचे वर्णन अधिक आढळते.  त्यामुळे या प्रवासवर्णनात्मक लेखनाचे स्वरूप संमिश्र असे आहे.  तसेच स्थलवर्णन, व्यक्तिचित्रण, प्रसंगवर्णनेही आलेली आहेत.  असे त्यांचे लेखन केवळ मार्ग व स्थळ यांच्या भौगोलिक नकाशाचे स्वरूप न होता त्यांच्या प्रवासात आलेल्या मानवी जीवनाशी संबंध व त्यातून घडलेली अनुभूती यांचे वास्तवचित्रण आले आहे.  यामध्ये व्यवहारनीती, तत्त्वज्ञान, श्रद्धा, संगीत, नृत्य, नाटक, कला, धर्म, अंधश्रद्धा, व्यवसाय, राजकीय स्थिती, शेतीभाती, शिक्षण आदी सर्व अंगांनी प्रसंगानुसार विचार केला आहे.  याची अनेक उदाहरणे त्यांच्या या लेखनात रेखाटलेली आहेत.