यशवंतराव चव्हाण यांच्यासंबंधी अनेक मान्यवर लेखकांनी लिहिलेल्या ग्रंथांचा या लेखनासाठी संदर्भ म्हणून उपयोग केला आहे. तसेच यशवंतराव चव्हाणांच्या लिखित व अलिखित भाषणांचा आम्हास या ग्रंथलेखनासाठी अमूल्य उपयोग झाला आहे. पुणे व शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या डॉक्टर ऑफ लॉज व डॉक्टर ऑफ लेटर्स या पदव्यांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला आहे. तसेच त्यांचे फोटो व वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना मिळालेले मानसन्मान याचाही यथोचित योग्य ठिकाणी उल्लेख केलेला आहेच. हे करण्याचा आमचा हेतू त्यांचे शैक्षणिक कार्य व विचार तरुण पिढीला माहिती व्हावेत हाच आहे. या सर्व संस्थांचा व महनीय व्यक्तींचा मी अतिशय आभारी आहे.
प्रबंधाचे लेखन करत असताना अत्यंत जिव्हाळ्याने सतत प्रेरणा देणारे बलभीम महाविद्यालय, बीड येथील मराठी विषयाचे विभागप्रमुख डॉ. विद्यासागर पाटंगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय या कार्याची सिद्धता होऊच शकली नसती. केवळ त्यांच्यामुळेच माझ्यातील लेखक आकारला गेला. किंबहुना मला साहित्यिक दृष्टी देऊन गुरुवर्यांनी माझ्याकडून जे लेखन करून घेतले त्याचेच फलित म्हणजे प्रस्तु ग्रंथ होय. या पुढेही मला त्यांचे मार्गदर्शन मिळावे. माझी साहित्यक्षेत्रातील वाटचाल गतिमान होण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहेच. म्हणून त्यांचे औपचारिक आभार मानून बाजूला होणे मला योग्य वाटत नाही. मी त्यांच्या ॠणातच राहू इच्छितो.
माझ्या या लेखनासाठी अनेकांनी मला मदत केली. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे व आमच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अशोकराव जगताप यांनी अनेकदा माझ्या मनावरील उदासीनतेचे मळभ दूर करून मला संशोधन कार्यास प्रवृत्त केले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवव्या योजनेअंतर्गत मला 'टीचर रिसर्च फेलोशिप' मिळवून देण्यात मा. कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, माजी आमदार जी. एल. ऐनापुरे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच माजी प्राचार्य उत्तमराव देशमुख, माजी प्राचार्य अनंतराव पाटील, प्राचार्य यशवंत पाटणे, प्रा. डॉ. आर. जी. पाटील यांचे वारंवार मार्गदर्शन मिळाले. त्यांचे ॠण मी व्यक्त करतो. आमच्या संस्थेच्या उपक्रमशील सचि सौ. शुभांगीताई गावडे यांनी दिलेल्या आत्मबळाबाबत त्यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. संस्थेचे सहसचिव माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. रमेश दापके यांच्या सुयोग्य मार्गदर्शनामुळेच हा ग्रंथ सिद्ध होऊ शकला. माझ्या लेखनाचा हा पहिला प्रवास त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे व कौतुकामुळे सफल झाला. हा ग्रंथ सिद्ध करण्यात त्यांची जी मोलाची मदत झाली व जे प्रोत्साहन मिळाले ते आभार मानण्यापलीकडचे आहे. त्यांच्या ॠणात राहण्यातच मला जास्त समाधान आहे.
या ग्रंथलेखनाच्या वेळी मला अनेक परींनी अनेकांची मदत झाली. श्री. भारत गजेंद्रगडकर व प्रा. आनंदा जाधव यांच्याशी केलेल्या चर्चेचा मला उपयोग झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद जी. ललेकर यांनी केलेले मार्गदर्शन व त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चा उपयुक्त ठरल्या. त्यामुळे लेखनाची दिशा निश्चित झाली. ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव, सोलापूर विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. रामराव पाटील, प्राचार्य जयसिंगराव देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेचा मला खूप उपयोग झाला. लेखनाचे महत्त्व आणि गरज पटवून देऊन या सर्वांनी मला लेखनासाठी प्रेरित केले. माझे सहकारी प्राध्यापक व मित्र यांनी केलेल्या सूचना मोलाच्या ठरल्या. या सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.
माणूस समाजात वावरत असताना एखादी गोष्ट कानावर पडते. तीच गोष्ट घरातही सतत कानावर पडली तर त्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करण्याची कल्पना माणसाच्या मनाला भुरळ घालू लागते. घरातूनही मी लेखन करावे म्हणून सदैव पाठपुरावा करणारे माझे सासरे इतिहास संशोधक मा. गोपाळराव देशमुख यांना हे श्रेय द्यावे लागेल. स्वतःमधील साहित्य संस्काराची ज्योत आमच्यात तेवत ठेवण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न असतो. माझ्या कुटुंबातील आईवडिल व इतर कुटुंबियांनी लेखन काळात मोलाचे सहाय्य करून मला कौटुंबिक ॠणात बांधून ठेवले आहे. त्यांचे ॠण शब्दातीत आहे.