यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण :१०१

विवेकवंत नेते

काँग्रेस स्थापनेच्यावेळी व पुढेही जे देशाचे पुढारी होते, ते नेमस्त होते. तरी विद्वान, व्यासंगी व त्यागी होते. दादाभाई नौरोजी, रानडे, भांडारकर वगैरेंची नावे उपलब्ध आहेत. जवाहरलाल, लोकमान्य टिळक, चित्तरंजनदास, अँनी बेझंट वगैरे विद्वान होते. यांना व तत्सम इतर अनेकांना विवेकवंत व त्याबरोबर पुढारी देखील म्हणता येते, यांनी देशाची सेवा केली. आज देशाचा उपयोग स्वार्थासाठी केला जात आहे व पुढा-यांचा प्रतिनिधींचा अभ्यास, व्यासंग व दूरदृष्टी कमी पडत आहे. राजकारण, अर्थकारण वगैरे विषयांवर अधिकार असलेली माणसे
पुढा-यात प्रांतिक स्थरावर व केंद्रातही एकाचढीत एक कमी आहेत. देशाजवळ सुपात्र माणसे अधिकाधिक हवी असतात. देश फार मोठा आहे. स्वातंत्र्यातील प्रश्न जास्ती बिकट उत्तरोत्तर होत आहेत. ज्यांना ‘विवेकवंत’ म्हणता येते, असे थोडेच आढळतात व जे आहेत ते शहरी विभागात राहणारे बहुधा आहेत. पुढा-यात सत्तेसाठी रस्सीखेच आढळते. तितकी विवेकवंतात आढळत नाही. विवेकवंत सत्तेच्या राजकारणापासून दूर राहतात. पुढारी, कार्यकर्ते अभ्यासाला, चिंतनाला फारसे स्थान देत नसलेले आढळतात. विद्वान, साहित्यिक, पत्रकार वगैरे मंडळी पैशाने विकत घेता येतात; असाही नवा अनुभव तयार होत आहे. मतिविक्रय सर्वात वाईट. पण बुद्धी मती-गहाण ठेवणारे वाढत आहेत. स्पष्टवक्ते, निर्भिड व मतस्वातंत्र्याचे चाहते वाढले पाहिजेत. वैचारिक साहित्य विचार वाढविते. समाजाला नवा विचार देणे हेही कार्य असते. मतदारांचे शिक्षण करून लोकशाहीची उंची वाढविणारे ‘लोकशिक्षक’ आज हवे आहेत. निवडणुकीला उभे राहून नाहक खर्च करणारे विवेकवंत आढळत नाहीत. ग्रामीण भागातील पुढारी व कार्यकर्ते ‘भाऊबंदकी’ ह्या घरच्यादारच्या दोषामुळे भांडत असतात. निवडणुकीत अमाप खर्च करीत असतात, विवेकाचा अभाव दिसतो. तर्कतीर्थ, विठ्ठलराव गाडगीळ, वसंत साठे, डांगे, टिळक वगैरे विवेकवंतात पक्षभेद आहेतच, ते आपआपसात भांडत स्वसमाजाचे नुकसान करीत नाहीत. पक्षभेद विसरून विधायक कार्यासाठी एका व्यासपीठावर येतात. एकाच घरात नाना पक्षाचे लोक राहू शकतात. इतरेजनांतील पुढारी माणसे एकमेकांचा सूड उगवीत असतात! विवेकवंताकडून शहाणपण शिकत नाहीत! विवेक-सारासार विचार यांची वाढ पुढा-यात व कार्यकर्त्यात होईल तर ‘पुढारी’ शब्दाला विधायक चांगला अर्थ प्राप्त होईल, व्हावा म्हणूनच ही चिकित्सा येथे व्यक्त केली आहे.

सारासारविवेक

सर्वच पुढारी अपात्र असतात, अविवेकी असतात असे प्रतिपादण्याच येथे उद्देश नाही. पुढारी ह्या संज्ञेला ‘टर्म ऑफ रिप्रोच’ असा उलटा अर्थ प्राप्त होत आहे, हा होऊ नये. पुढारी (व पुरोहित देखील) महत्वाचे असतात. गव्हाबरोबर किडे येथे रगडावयाचे नाहीत. ज्या ज्या वेळी समाजाला, राष्ट्राला सुपात्र पुढारी मिळतात तेव्हा राष्ट्र पुढे येते. फसवणूक करणारे पुढारी, पुरोहित असले म्हणजे राजकारण व धर्म दोन्हीही अधिपतित होतात.