यशवंतराव चव्हाण: विचारांचा गाभा सामाजिक
यशवंतराव चव्हाण यांचे विचार व्यक्तीचे संस्कार व चळवळी यांच्यापासून घडत गेले. व्यक्तीचे व्यापक ध्येय व चळवळीमधील अजेंडा चव्हाण यांच्या विचारांमध्ये दिसतो. यशवंतराव चव्हाण यांची वैचारिक जडणघडण स्वतंत्रपणे झाली होती. चव्हाण काँग्रेस पक्षात काम करत होते. या पक्षाचा पहिला टप्पा हा उदारमतवादी, आधुनिकतावादी, सामाजिक-राजकीय सुधारणा एकत्र करणारा होता. या टप्प्यातील वरील मुद्दे यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये होते. दुसरा टप्पा हा टिळक युगाचा होता. यशवंतराव चव्हाण यांच्यावर लोकमान्य टिळक यांचे संस्कार झाले होते. चव्हाण यांचे टिळक हे स्वराज्याच्या चळवळी संदर्भात आदर्श होते. मात्र चव्हाण यांनी सामाजिक व धार्मिक क्षेत्रात टिळकांचा विचार स्वीकारला नाही. लोकमान्य टिळक यांच्यातुलनेत यशवंतराव चव्हाण यांच्यावरती त्यांच्या कुटुंबातील सामाजिक-धार्मिक संस्कार जास्त प्रभावी होते. आई व बंधू यांच्याकडून सामाजिक-धार्मिक संस्कार झाले. हे संस्कार यशवंतराव चव्हाण यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांपासून वेगळे करणारे होते. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मुद्दाही टिळक यांच्या संस्काराबाहेर जातो, असे रा. ना. चव्हाण यांनी मत नोंदविले आहे. हा मुद्दा रा. ना. चव्हाण यांनी पुढे आणला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यावर टिळक यांचे संस्कार जरी असले तरी राष्ट्रीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचे मुख्य कारण भगतसिंग यांच्या फाशीमध्ये होते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या प्रेरणेचा उगम रा. ना. चव्हाण यांनी लोकमान्य टिळक यांच्या बाहेर दाखविला आहे. यासंदर्भामध्ये म. गांधी व पंडित नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव चव्हाण यांच्यावर पडला होता. जवळजवळ तीन दशके चव्हाण गांधीजीच्या चळवळीशी संबंधित होते (१९२०-१९४७) व पं. नेहरू याच्याशी राजकीय संबंद चव्हाण यांचे चार दशकांचे होते. त्यामुळे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या मुद्द्याच्या संदर्भात चव्हाण यांच्यावरील प्रभावाचे मोजमाप नीटनेटके केले तर चव्हाण यांचे विचार विविध घडामोडीतून तयार झाले. त्यास केवळ लोकमान्य टिळक हे एकच कारण नव्हते. हा मुद्दा रा. ना. चव्हाण यांनी मांडला आहे.
यशवंतराव चव्हाम यांच्या व्यक्तीमत्वावर झालेले संस्कार हे सदसदविवेक बुद्धीच्या निकषावर आधारित झाले होते. सदसदविवेक बुद्धीच्या आधारे यशवंतराव चव्हाण यांनी समाजकारण व राजकारणात फरक केला. सदसदविवेक बुद्धी चव्हाणामध्ये शिक्षण घेण्याच्या काळापासून दिसून येते. ब्राह्मणेतर चळवळीपासून अलिप्त राहण्याचा मुद्दा हा होता की, ब्राह्मण जातीचा द्वेष करून सामाजिक – राजकीय प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे यशवंतराव चव्हाम यांनी ब्राह्मण जातीचा द्वेष केला नाही. ब्राह्मणद्वेष हा मुद्दा वेगळा व ब्राह्मण्यवादाला विरोध करणे वेगळे असा फरक म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता.