परमविचारांनी विवेक साकार होतो. सर्वच ऐतिहासिक धर्म परंपरेने जाती (CASTES) झाल्यामुळे जातिभेदात भरच पडली व राजकारणात वेगवेगळे धर्म, त्यांची स्वतंत्र राज्ये मागू लागले आहेत. या विभक्तपणाला भाषावारीचाही पाठिंबा मिळत आहे. उदा. मसुलमान धर्म व त्यांची भाषा ‘उर्दू’; ही अलग मानली जाते. हिंदू हे संस्कृताचा अभिमान धरतात व ही व्यवहारात नसलेली संस्कृत भाषा राष्ट्रभाषा व्हावी, असेही धर्ममार्तंड प्रतिपादितात. पुढारीपण हे अशाप्रकारे धर्मगुरूंच्याकडे जाऊ लागल्यामुळे देशाच्या एकतेस धोका प्राप्त होण्याची वेळ आली आहे. पुरोहित व पुढारी जर सारासारविवेक करतील तर धर्मांधतेतून राजकारणात आडवे येणारे पुष्कळ प्रश्न मिटतील, धर्माचा धर्मपुढा-यांकडून दुरूपयोग जास्ती होत असल्यामुळे ह्या सर्वांवर तोडगा म्हणून ‘निधर्मीवाद’ पुढे आला आहे, नव्हे आणावा लागतो. कारण ‘धर्म’ हे मूलत: अमृत असते पण त्याला अफूचे स्वरूप येते. अशावेळी विवेक फार जररूरीचा आहे. ‘धम्म’नीती हवीच असते.
पुढारी लोकांची दहशत!
पुढारी शब्द ग्रामीण भागात जास्ती रूढ आहे. जो तो पुढारी होत आहे. प्रत्येक खेड्यात दोन तरी पार्ट्या – राजकीय असतात व गावाची शक्ती विभागली जाते. मतभेद खेळण्यातच वेळ जातो. विकास बाजूला राहतो. खेड्यापाड्यांत विवेकवंताचा अल्पसंख्यही वर्ग नसतो. जेथे ज्या खेड्यात विचारी माणसे असतात, तेथे गावातल्या पार्ट्या मिटविल्यादेखील जातात. अशी माणसे विचारी होती, म्हणून गावगाडा मागे हजारो वर्षे चालला. ‘Country life is sweet’ ही ग्रामीण जीवनाची व्याख्या आता पूर्ववत करणे मुष्कील झाले आहे. ग्रामीण पुढारी गावात दहशत निर्माण करीत असतात. सरंजामशाहीचा व सरदारशाहीचा, वतने गेली तरी पीळ आहेच. फक्त सुंभच जळाले. पुढारी राजकारणात आपली वतनदारी निर्माण करू लागले आहेत. जणू काही पुढारी आजकालचे नवे सरदारच होऊन बसतात. निवडणुकातून व एरव्ही देखील यांची दहशत असते. खेड्यात अल्पसंख्याकांना व दलितांना मोकळी व निर्भय वागणूक करीता येत नाही. ‘बघून घेईन’ असा दम पुढारी देतात. खेड्यात सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य नसते, म्हणूनही शिक्षित व मध्यमवर्गीय लोक खेड्यात राहणे टाळतात. या प्रकारामुळे खेडी मागे पडतात. वैचारिक विकास होत नाही. निवडणुकीच्या राजकारणाचे दुष्परिणाम वाढते आहे. पूर्वी हे सर्व नव्हते तरी सूज्ञ समजूतदार पुढा-यांचे लोक ऐकत.
मागे राजकीय असंतोष निर्माण करण्यासाठी कायदेभंगी चळवळ झाली. पण तिच्यानंतर कायद्याच्या राज्याची, अधिकारी सत्तावंतांची व पोलिसांची जनतेवरील चांगली छाप व भय मावळत गेले. भूमिगतांची चळवळ पुढे आली व पुढा-यांचे सरकार प्रतिराज्य बनले. यामुळे देखील पुढारी लोकांचे प्राबल्य महती वाढून एकपरी खेड्यापाड्यांतील स्वातंत्र्य नष्ट होते व खरी लोकशाही लोपते. पुढारी मंडळी ज्यात त्यात हस्तक्षेप करतात. शिक्षण सहकार, पंचायत राज्य वगैरेमध्ये पुढारी लोक सेवकवर्गावर, कर्मचा-यांवर वजन खर्च करतात. एकूण शासनयंत्रणेला पुढारी मंडळीना सांभाळावे लागते. शासनयंत्रणेचे स्वावलंबन व स्वयंनिर्णय लोपतो. हल्ली सरदारशाहीच्या ऐवजी पुढारीशाहीचे राज्य असते व हे पुढारी बहुतेकपणे सत्ताधारी पक्षातील पुढा-यंची सत्ता-संपत्ती, ‘मान-पान-ठाण’ वर्धमान राहात असल्याने विरोधी पक्षांना कार्यकर्ते व पुढारी मिळेनासे झाले. विरोधी राहावयाचे झाल्यास त्याग पाहिजे व आजकालच्या दुर्मिळतेच्या व महागाईच्या दिवसात त्याग व स्वयंसेवा परवडत नाही. म्हणून पुढा-यांत सत्ताधारी पक्षातील पुढारीच फार असतात व लोकही त्यांना मानतात. कारण दरबारातील कामे व्हावी लागतात. सत्तेशिवाय शहाणपण नसते व सत्तेवरच्या पुढा-यांनाच लोक विचारतात!