फलटणच्या नव्या तुरूंगातला, मी पहिला राजबंदी!
८/१० दिवसांनी ते मला सातारा जेलमध्ये घेऊन गेले.
तिथं मला दरोडेखोर रामोशी कोतावडेकर भेटला-
दरोडे घालण्यातसुद्धा त्याचे नियम असतात! (सौम्य हशा)
हे त्यानं मला सांगितलं - म्हणजे ते त्यांच्या नियमानुसार आपले नियम मोडतात!! (हशा)
-पंचांग पाहून दिशा ठरवायची, दिवस ठरवायचा!
-आपला गाव ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत आहे, त्या आणि शेजारच्या गावात दरोडा घालायचा!
-बायकांच्या अंगावर हात टाकायचा नाही!!... आणि
-दरोडयातली चौथा हिस्सा कमाई, गोरगरीबांना वाटायची- असे त्यांचे नियम असत!
सातारा आणि पुणे सर्कलच्या पोलिसांनी मला ठोकळेबाज आणि निर्बुध्द प्रश्न विचारले:
“आणखी कोण होतं तुमच्याबरोबर?”
“काय काय केलं तुम्ही?”
“तुम्हाला आसरा कुणी दिला?”
“पैसे कोण द्यायचं?”
मला वाटलं होतं: पोलस असतील अडाणी, पण अधिकारी?
ते तरी सुबुध्द प्रश्न विचारतील- चळवळीबद्दल ज्ञान दाखवतील
पण, सगळाच उजेड! मी मनातल्या मनात पोलिस खात्याची कीव केली.
मला ६ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. ‘ब’ वर्ग मिळाला-
४-६ दिवसांनी येरवडयाला रवानगी... पुन्हा त्या राहुटया! मनाशी म्हटलं:
‘जेलमध्ये राहुटयांचाच योग दिसतोय्!’
त्यामुळे ओळखीच्या घरी आल्यासारखं वाटलं...
वाचण्याची व्यवस्था उत्तम होती. आर्थर कोएस्लरची
Darkness at noon! ही कादंबरी मी इथंच वाचली:
स्टॅलिनच्या राजवटीनं केलेल्या राजकीय छळाची ती हदयद्रावक कहाणी,
कलापूर्ण असूनही- मला प्रचारकी थाटाची वाटली.
चर्चा आणि वाचन, यात ५-६ महिने कधी गेले, ते कळलंच नाही! निरोप आला:
“तुमची शिक्षा संपलीय्-“ म्हटलं, “सरकारचा आणखी काही हुकूम?”
“काही नाही- तेव्हा आता तुम्हाला सोडून देणंच भाग आहे!” (सौम्य हशा)
एक वर्षानं घरातल्यांना परत भेटलो. गणपतराव क्षयानं आजारी होते...
दोन-तीन आठवडयातच, मला तिस-यांदा अटक झाली- यावेळी त्यांनी मला ‘क’ वर्ग दिला.
आता मात्र माझ्या मनातला संघर्ष शिगेला पोचला: दादा गेले, गणपतराव अंथरूणाला खिळलेले,
वेणूबाईची प्रकृति तोळामासा, आई काहीही न बोलता, सगळं सहन करतेय्- पण, विलक्षण दु:खी आहे.
...१९४५ साल. मे महिन्यात महायुध्द संपलं; मी ‘पॅरोल’ वर सुटलो-
जुलैत सत्तांतराची चर्चा सुरू झाली. घटनांना वेग आला...
निवडणुकीचे वारे वाहू लागले; ही उजाडण्यापूर्वीची पहाट होती-
(चिमण्यांचा चिवचिवाट, भूप रागाची सुरावट ऐकू येते)
ह्या निवडणुका घ्यायला, ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल उत्सुक नव्हते.
जुलैच्या शेवटच्या आठवडयात, स्पेनच्या सीमेवर,
एका अतिशय सुंदर स्थळी, ते विश्रांतिसाठी थांबले होते!
चित्र रंगवण्यासाठी त्यांनी कुंचला हाती घेतला, आणि हिंदुस्थानातल्या निवडणुकींची घोषणा त्यांनी ऐकली.
चर्चिल वैतागून म्हणाले: “मी इथं चांगला चित्रकलेत गुंतलोय्, आणि यांना तिकडं निवडणुका सुचताहेत!”
ब्रिटिश साम्राज्यावर, ‘सूर्य कधीही मावळत नाही!’ अशी दर्पेक्ती काढणा-या या बुल डॉग’ नं
हिंदुस्थानातल्या निवडणुकींची धास्ती घेतली होती!
उमेदवार म्हणून माझ्या नावाला सर्वात जास्त मतं मिळाली!
४० वर्षं मी निवडणुकींच राजकारण खेळलो, पण, इतकी सरळ, बिनखर्चाची, तत्वनिष्ठ- आणि
जनतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्यावर झालेली ही ४६ सालची एकमेव निवडणूक!!!
माझ्यासकट सातारा जिल्हा कॉंग्रेसचे चारही उमेदवार प्रचंड बहुमतानं निवडून आले.
वेणूबाईनं मला ओवाळलं. मी हळूच म्हणालो, “ह्या यशात तुझाही वाटा आहेच!”
“अं हं- अशी वाटणी करायची नसते-“ जीवनात असे क्षण क्वचितच येतात.
-आनंदाचे, अंत:करण हेलावून टाकणारे...