भूमिका-१ (40)

(इतर महान समस्यांचाही निर्देश आम्ही केलेला आहे : उदा.,) जातीयतावाद, प्रादेशिकतावाद, विभक्ततावाद (Divisiveness) या समस्या आ वासून खड्या आहेतच. गेल्या दोन वर्षांत आपल्या देशात सर्वांत भीषण जातीय दंगे उसळलेले आपण पाहिले आहेत. महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा वारसा सांगणा-या पक्षाला हे दंगे कायमचे थांबवण्यात यश येऊ नये, ही लज्जास्पद घटना होय. गृहमंत्री या नात्याने या अपेशाच्या दोषाचा माझा वाटा मलाही आपल्या पदरात घ्यायला हवाच. पण एकेकट्या मंत्र्याला वा शासनाला ही समस्या सोडवणे मात्र शक्य होणार नाही. देशात अवश्य ते वातावरण निर्माण करण्यात, जनतेच्या मनात यथायोग्य मूल्यांना स्थान प्राप्त करून देण्यात आपण अपेशी ठरणार असलो, तर आशेला मुळीच वाव नाही. या समस्यांवर सोपे व सुलभ आणि झटपट उपाय सापडण्याची थोडी देखील शक्यता नाही. म्हणूनच काही समस्यांची दखल घेणे अगत्याचे होऊन बसले आहे.

जातिवादाच्या समस्येचा विचार करतानाच अल्पसंख्याकांच्याही समस्येचा उल्लेख करणे मला इष्ट वाटते. मुसलमान, ख्रिस्ती व इतर अल्पसंख्य लोकांच्या मनात तक्रारीची, उपेक्षितत्वाची भावना निश्चितच आहे. (याचा निर्देश आम्ही केलेला आहे.) तिचे अस्तित्व नाकारण्यात काहीच अर्थ नाही. आणि या अल्पसंख्याकांशी सामुदायिक संपर्क साधण्याचा व त्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करण्याचा जुना कार्यक्रम आपण नव्याने हाती घ्यायलाच हवा. आपण स्वीकारलेल्या सामाजिक व राजकीय राष्ट्रविकासाच्या कार्यात त्यांनाही समान पातळीवरील सहकाऱ्यांच्या नात्याने सामील होता येईल, असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण व्हायला हवा.

अस्पृश्यतावाद या देशात फिरून डोके वर करू पाहात असल्याची चिन्हे दुर्दैवाने दृश्यमान होऊ लागली आहेत. अस्पृश्यता ही पवित्र, धार्मिक बाब असल्याचा दावा सांगायला एखादा मनुष्य, स्वातंत्र्य मिळून वीस वर्षे लोटल्यावरही, पुढे सरसावेल, असे आम्हांला कधीच वाटले नव्हते. निदान मला तरी असे साहस कोणी करू शकेल, असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. कोणाही व्यक्तीचा उल्लेख करून तिला नसते महत्त्व द्यायची माझी इच्छा नाही, कारण अशा बाबतीत काही गोष्टी न्यायप्रविष्ट केल्या जाण्याचाही संभव असतो. पण दुर्दैवाने काही व्यक्ती तसा दावा करायला पुढे सरसावल्याचे आपण प्रत्यक्षच पाहिले आहे. आजच्यासारख्या काळातदेखील अस्पृश्यतेला पाठिंबा लाभावा आणि चातुरवर्ण्याचे समर्थन करायला एखाद्याने पुढे सरसावावे, याचा मला अचंबा वाटतो.

येथे मी एक मुद्दा मांडू इच्छितो. केवळ आर्थिक विकास, समाजवादी अर्थव्यवस्था एवढाच या देशापुढचा प्रश्न नाही. या उदंड विभक्ततावादी प्रवृत्तींनाही आपल्याला तोंड द्यायचे आहे. भाषिक व प्रादेशिक हेव्यादाव्यांवर आधारलेल्या फुटीर प्रवृत्तींशी आपल्याला अजून सामना द्यायचा आहे. हा सामना द्यायला काँग्रेस बद्धपरिकर झालेली आहे. वस्तुत:, तीच तिची ऐतिहासिक भूमिका आहे. किंबहुना हा एकच सामना नव्हेच. तसेच त्यात एकच आघाडी लढवायची नसून, भारताला शंभर आघाड्यांवर लढा द्यायचा आहे. या रोगांचा प्रतिकार आपण करायला हवा असून, तीही धैर्याने व आत्मविश्वासानेच, समतोल मनानेच करायला हवा आहे.