• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (99)

जातीजातींत विभागल्या गेलेल्या आणि जन्मसिद्ध उच्चनीचतेच्या कल्पनांवर आधारलेल्या आमच्या समाजात बहुसंख्य लोक शिक्षणाला हजारो वर्षे वंचित झालेले होते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ज्ञानोपासना, ज्ञानाचे संवर्धन हे या समाजात विशिष्ट जातीचेच कार्य होते. अशा समाजात शिक्षण सर्वांना खुले होणे, हा एक महान क्रांतीचाच आरंभ होता. जन्मसिद्ध श्रेष्ठतेऐवजी गुणांच्या आधारावर तो ठरणे म्हणजे या समाजाचा कायापालट होणे, ही एक महान क्रांतीच होय. या क्रांतीचा आरंभ सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच आमच्याकडे झाला. शिक्षणाचे हे रहस्य ओळखून त्या दिशेने प्रत्यक्ष कार्यप्रवण होणारांत, महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, महात्मा ज्योतिराव फुल्यांनाच अग्रपूजेचा मान दिला पाहिजे. दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकरशेट, छत्रपती शाहू महाराज, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख अशा अखिल भारताला ललामभूत झालेल्या विभूतींनी शिक्षण-प्रसाराची उज्ज्वल परंपरा निर्माण केली. शिक्षणप्रसाराची कल्पना त्यांच्या थोर कार्यामुळे आमच्या मनोभूमीत खोलवर रुजली. भारतीय पातळीवरही राजा राममोहन रॉय, सय्यद अहमद अशांसारख्या थोर व्यक्ती होत्याच. अलिकडच्या काळातील आम्हांला परिचित उदाहरण म्हणजे सयाजीराव महाराजांचे. तात्पर्य, मनोभूमीत रुजलेल्या या आकांक्षेला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वाव मिळणे अगदी स्वाभाविक होते. मर्यादा होत्या, त्या फक्त साधनसामग्रीच्याच.

स्वातंत्र्य-प्राप्तीनंतर झालेला शिक्षणप्रसार हा या वैचारिक आणि सामाजिक परंपरांचा परिपाक म्हणावयास हवा, पण त्यातही एक मोलाचा विचार होता. आपल्यापुढील निरनिराळे प्रश्न सोडवायचे झाल्यास त्यासाठी अर्थिक विकास झपाट्याने केला पाहिजे, याविषयी या सर्व विचारवंतांचे एकमत होते. आपल्या देशात प्रांत, भाषा, धर्म यांची असलेली विविध रूपे अशी गुंतागुंतीची आहेत, की त्यामुळे आर्थिकच काय, परंतु इतर राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे कामही अधिक गुंतागुंतीचे व अवघड होते. यासाठी देशाच्या या विविधतेत अंतर्भूत असे जे ऐक्य आहे, ते आधी शोधावे लागेल. आणि ते शोधण्यासाठी लोकशाहीची पद्धती हीच योग्य निर्णयपद्धती आहे, हे मान्य करावे लागते.

लोकशाही म्हणजे केवळ बहुमताने निर्णय घेण्याची पद्धती, असे न मानता ती जीवननिष्ठा बनावी लागेल, तरच तिचा पाया भक्कम होईल, याची जाणीवही अनेकांना होते. जात, गोत, धर्म, भाषा, प्रदेश, प्रतिष्ठा, पैसा इ. सर्वांपेक्षा व्यक्तीचे व्यक्ती म्हणून प्राथम्य मान्य केल्यावाचून लोकशाही ही जीवननिष्ठा होऊ शकत नाही. तशी ती झाली पाहिजे. लोकशाही निर्णयपद्धती वा राज्यव्यवस्था राबवून, डोईस मत ही तरफ वापरून समतेवर आधारलेला समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट आपण पुढे ठेवले आहे. असा समाज निर्माण करण्याचे आर्थिक विकास हे देखील एक महत्त्वाचे साधन आहे. अशा समाजरचनेचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी शिक्षणाची आवश्यकता आणि उपयुक्तता ध्यानी घेऊन आपण प्रयत्नशील राहिलो. स्वातंत्र्यात्तर काळात झालेल्या शिक्षणप्रसाराची ही खरी पार्श्वभूमी आहे, असे मला वाटते.