• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (86)

भारताचे आर्थिक, राजकीय, सामाजिक प्रश्न गुंतागुंतीचे आहेत, हे तर स्पष्टच आहे. लोकशाही समाजवादाची प्रक्रिया ही संथ गतीची व सावकाशीची आहे. याचा अर्थ आपल्याला थांबून चालणार नाही. समाजवादी समाजाच्या प्रस्थापनेसाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल आणि त्यासाठी अनुकूल अशा पक्षरचनेचाही विचार करावा लागेल. नेतृत्व समाजापासून दूर चालले आहे, याचा अर्थ असा, की लोकशिक्षणाची प्रवृत्ती कमी झाली आहे. नव्या पिढीतील गरीब वर्गातील तरुणांनी पुढे येऊन नेतृत्व ताब्यात घेतले पाहिजे, हाच यावर उपाय आहे, असे मला वाटते. ज्या समाजाचे चित्र आपल्याला बदलावयाचे आहे; ज्यांची गरिबी नाहीशी करावयाची आहे, त्या वर्गातील तरुणांनीच कोणाच्याही निमंत्रणाची वाट न पाहता पुढे येऊन, नव्या विचारांची कास धरून कामाला जुंपून घेणे जरूर आहे.

पोटनिवडणुका किंवा सार्वत्रिक निवडणुका यांच्या निकालाचे अर्थ जो तो आपापल्या सोयीने लावणारच. पण देशातल्या शहाणपणावर माझा विश्वास आहे. १९६७ च्या निवडणुकांनंतर देशात निरनिराळ्या 'सेनां'चे राजकारण सुरू झाले होते. परंतु त्यातले धोके जसजसे नजरेपुढे येत राहतील, तसतसे संकुचित विचार नाहीसे होण्यास मदतच होईल. प्रादेशिक विचाराचा धोका राष्ट्रवादाला तर आहेच, पण शिवाय पुरोगामी विचारालाही तो मोठा अडथळा आहे. कारण प्रादेशिक विचारप्रणालीतून प्रतिगामी वृत्तीचे लोक नेतृत्व करण्यासाठी सरसावतात आणि मोक्याच्या जागा अडवून बसतात. आज तर संकुचित विचारवृत्ती प्रादेशिक वादापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. सर्वच क्षेत्रांत ती पसरली आहे.

चलनवाढ, महागाई व आर्थिक समस्या या सर्वच अविकसित राष्ट्रांसमोरील समस्या आहेत. या प्रश्नांतून बाहेर पडावयाचे, तर शेतकऱ्यांपासून तो कामगार आणि मध्यमवर्गीय संघटित वर्गाने केवळ 'ट्रेड युनियन'चा विचार आणि फायदा आपल्या नजरेसमोर ठेवून चालणार नाही. सर्व क्षेत्रांतील उत्पादन वाढविणे आणि राष्ट्रिय संपत्ती वाढविणे, यावरच आपले सर्वांचे लक्ष केंद्रित झाले पाहिजे. केंद्र सरकारने त्यासाठी काही धोरण निश्चित आखलेले आहे. त्याची पूर्णांशाने अंमलबजावणी होत नाही, ही मोठी उणीव मानावी लागेल. हे काम राज्यांचे किंवा ते काम केंद्राचे, अशी कामाची टोलवाटोलवी होत राहिल्याने साध्य दुरावते. खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील कर्मचाऱ्यांमध्ये, तसेच शेतकरी, आणि कामगार यांच्या ठिकाणीही समाजवादाची जाण आणि विश्वास निर्माण करणे हेच मूलभूत कार्य आहे, असे मी मानतो.

पुरोगामी विचाराचे व आचाराचे बोट धरून मी आजवर वाट चालत आलो. देशाला सुखी करण्याच्या शिखराकडे नेणारी ही वाट आपणा सर्वांनाच धरावी लागणार आहे. पुढचा पल्ला एकमेकांच्या साथीनेच गाठावयाचा आहे. 'सर्वे सुखिन: संतु' असे घडण्याची शक्ती लाभावी, हीच सदिच्छा.