• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (77)

आर्थिक विकासाचा काही तात्कालिक व दूरगामी स्वरूपाचा विचार करीत असताना, या आर्थिक विकासातून समाजातील लोकशाही शक्ती बलशाली कशा होतील, याचेही भान राखावे लागणार आहे. भारतीय राज्यघटनेत लोकशाही सारखी मूलगामी स्वरूपाची मूल्ये आपण स्वीकारली आहेत. आर्थिक विकासातून ही मूल्ये अधिक सामर्थ्य संपन्न होतील, याचा प्रयत्न झाला, तरच आर्थिक विकासाला काही अर्थवत्ता प्राप्त होईल. तो प्रश्न अर्थपूर्ण होईल. भारतातील लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही. ही लोकशाही देशातील गरिबी हटवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येथील प्रश्न हा केवळ आर्थिक विकासाचा प्रश्न नव्हे. लोकशाही मूल्ये टिकविण्याचाही हा प्रश्न आहे.

पुढल्या काळातील आव्हाने स्वीकारताना हे सर्व संदर्भ ध्यानी घ्यावे लागतीलच. पण त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या या कार्यात करोडो लोकांचा सहभाग निर्माण करावा लागणार आहे. कारण या करोडो हातांच्या परिश्रमातून, त्यागातून आणि सहकार्यातून देशाची गरिबी हटवता येणार आहे. दारिद्रयाविरुद्धची लढाई जिंकायची आहे. करोडो लोकांनी एकजुटीने आणि जिद्दीने दिलेल्या लढ्यामुळेच स्वातंत्र्य मिळविणे शक्य झाले आहे. दारिद्र्याविरुद्धचा लढाही असाच राष्ट्रिय दृष्टिकोणातून व प्रदीर्घ परिश्रम करून आणि वर्षानुवर्ष संघटित प्रयत्न करूनच सोडवायचा आहे. किंबहुना आपला आर्थिक पवित्रा अणि आवाज असाच राहिला, तरच त्याला अपेक्षित यश मिळणार आहे. आर्थिक विकासाची सुनिश्चित अभिवचने देऊन त्यांसाठी सर्वांनी जनसेवेला वाहून घेतले आणि तदनुषंगाने राजकारणाचा विचार आणि आचार करू लागलो, तर हा देश व लोकशाही समाजवाद स्वत:चे संरक्षण स्वत:च करील आणि कालांतराने सामाजिक समस्यांच्या सोडवणुकीच्या दिशेने आपल्या या कृतींचा अनुकूल परिणाम घडल्याचे अनुभवास येईल.

आर्थिक समस्यांना एक राजकीय अंग असते. सुराज्याची घोषणा आपण करतो, पण त्या सुराज्याची प्रचीती सर्वसामान्य जनतेला येणे महत्त्वाचे असते. परिस्थितीत योग्य ते फेरबदल घडून आपल्या समस्या सुटत असल्याची जाणीव लोकांना होणे ही आजची प्रमुख गरज मानली पाहिजे. राज्य करावयाचे, ते निर्जीव वस्तूंवर नव्हे. शासनकर्ते बनून गतिमान आर्थिक परिस्थितीशी झुंज द्यावयाची, ती सजीवांसाठी! संख्याशास्त्रीय आकडेमोड करीत राहणे, भांडवल-गुंतवणुकीत अधिक महत्त्वाच्या बाबींना अग्रहक्क देणे, विकासाची गती निश्चित करणे हा झाला त्यातला एक तांत्रिक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग असा, की आर्थिक समस्यांचे सामाजिक दृष्टिकोणातून सर्वांगीण परीक्षण करणे आणि त्यांतल्या आधी कोणत्या सोडवायच्या, हे निश्चित करणे. पहिला भाग यथाक्रम घडत राहतो. पण महत्त्वाच्या दुस-या भागावर लक्ष ठेवणे अगत्याचे आहे. आमचा आर्थिक पवित्रा वा आवाज या रोखाने आणि त्याच्या पूर्ततेसाठी असायला हवा.