• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (35)

हरियाणात कित्येकांनी पक्षांतर केले असूनही आपण जिंकलोच. पराजयाला विजयाचे स्वरूप द्यायचा माझा अट्टाहास नाही. परंतु आपण सर्वच गमावले असून आता वाचवण्याजोगे काही उरलेलेच नाही, अशीही भावना मला निर्माण करावयाची नाही. माझ्या मते ती एक प्रकारची आत्महत्याच ठरते. ज्याच्या पाठीशी महान इतिहास आहे, आणि माझी खात्री आहे, की त्याच्यापुढे महान भविष्यही आहे, अशा या राजकीय पक्षाने परिस्थितीचा समतोल दृष्टीने विचार करून, वस्तुस्थिती नीट ध्यानात घेऊनच पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करायला हवा. काही माणसे, किंबहुना काही नेतेही जनतेने झिडकारले, असे आपण म्हणू. परंतु निवडणुकींच्या निकालाचा असा अर्थ खासच नाही, की आपल्या पक्षाचे धोरण व कार्यक्रम जनतेने अमान्य केले. मुदतपूर्व निवडणुकांचा अर्थ अशा पद्धतीने लावणे म्हणजे काँग्रेसचे अस्तित्व संपूर्णतया नाकारणे होय.    

मुदतपूर्व निवडणुकांच्या या पृथक्करणाच्या अनुषंगाने राष्ट्राच्या राजकीय विचारसरणीत वाहू लागलेल्या नव्या प्रवाहांचाही विचार करायला हवा.

आज ध्रुवीकरणाची भाषा बोलली जात आहे. ध्रुवीकरण म्हणजेच फुटाफुटीच्या अनुरोधाने स्वतंत्र मतप्रणाली धारण करणारे दोन पृथक् गट सिद्ध करण्याची प्रवृत्ती. देशात सुरू असलेले एक प्रकारचे ध्रुवीकरण वा विचारपद्धती मी समजू शकतो. पण आपण काँग्रेसच्या ध्रुवीकरणाचा विचार करू लागतो, तेव्हा काँग्रेसमध्येच अति उजवे व अतीव डावे अशी मतभेदजन्य फूट पाडावी, अशी अपेक्षा दिसते. असे करणे बरोबर ठरते का? (महाशय, या समितीचे असे ठाम मत बनले आहे, की) परिस्थितीचे हे मूल्यमापन सर्वस्वी चुकीचे असून तिच्यावर उपचार करण्याचा हा मार्ग संपूर्णतया चूक आहे. ऐतिहासिक दृष्ट्या लोकशाही समाजवादाचा पाठपुरावा काँग्रेसने केलेला आहे. तिचे स्वत:चे निश्चित कार्यक्रम असून तिने जनतेच्या हृदयात मानाचे स्थान मिळविलेले आहे. काँग्रेसच्या धोरणाने आपल्याला दगा दिल्याचे कोणीही सिद्ध केलेले नाही. आपण स्वत:च स्वत:ला दगा दिला असण्याचीही शक्यता आहे. पण काँग्रेसची धोरणेच अपेशी ठरली, असे आपण म्हणू शकत नाही. पण चालू काळात मात्र निरनिराळे लोक पुढे सरसावून 'आपण उजवा गट बनवण्याचा प्रयत्न करू या', अशी सूचना करताना दिसत आहेत. स्वतंत्र पक्ष व आपण यांत फारसा भेद नाहीच, असे सिद्ध करण्याचा कोणी प्रयत्न करीत आहेत. कोणी म्हणतात, 'आपण तर जनसंघालाच अधिक जवळचे आहोत'. उलट पक्षी, 'आपण पुढे सरून डाव्या पक्षांशी सख्य साधण्याचा प्रयत्न करू या', असा आग्रह करणारेही दुसरे काही आहेतच. हे 'डावे' म्हणजे काय, ते मला खरोखरीच समजत नाही. विध्वंसाची भाकिते करणारे काही भविष्यवादी तर, '७२ सालच्या निवडणुकीत काँग्रेस केंद्रातही मताधिक्य गमावणार आहे आणि म्हणून आपण आतापासूनच संयुक्त सरकारांचा विचार करायला प्रारंभ करायला हवा', असाही प्रचार करीत आहेत. संयुक्त सरकार कोणाच्या सहकार्याने आणि कोणत्या उद्दिष्टांसाठी?

देशातील राजकीय आराखड्याचा वा दृश्यांचा वस्तुनिष्ठ दृष्टीने विचार करावयाचा प्रयत्न आपण करू या.

आपण कोणाशी गट्टी करू पाहतो, आणि कशासाठी? मला आजचे राजकीय दृश्य दिसत आहे, ते असे: डाव्या बाजूला दोन, किंवा कदाचित दोहोंहून अधिक पक्ष असून ते स्वत:ला कम्युनिस्ट पक्ष व लोकशाही समाजवादी पक्ष म्हणवतात. उजवीकडे जनसंघ व स्वतंत्र हे पक्ष आहेत. त्यांतल्या कोणाशी तुम्ही संगनमत करू इच्छिता? जनसंघाशी आपले थोडे तरी मतैक्य आहे का? एक पक्ष धर्मनिरपेक्षता मानीत नाही, तर दुसरा जैसे थे परिस्थिती टिकवू पाहतो.