दुसरी एक समस्या गेली काही वर्षे लोकांना अस्वस्थ करीत आहे. ती म्हणजे प्रादेशिक राजकारणाची. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिसलेली एकात्मता एका समान शत्रूविरुद्ध केलेल्या युद्धातून निर्माण झालेली होती. बाहेरच्या शत्रूविरुद्ध युद्ध करताना एकत्रित होणे कठीण नसते. स्वातंत्र्यकाळातही १९६२ नि १९६५ साली या एकतेचा अनुभव आपण घेतला. स्वातंत्र्याची पहिली १७ वर्षे नेहरूंचे नेतृत्व होते. त्यामुळे आपल्या प्रादेशिक, भाषिक वा जातीय तंट्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांचा उपयोग होई. शिवाय एकपक्षीय सरकारे सर्वत्र होती. त्यामुळे आपल्यांतील मतभेद मिटविण्याचे संसदीय किंवा घटनात्मक मार्ग फारसे अवलंबावे लागले नाहीत.
पंडितजी गेल्यावर आणि १९६७ च्या निवडणुकी पार पडल्यावर जे राजकीय चित्र दिसले, ते अगदी वेगळे होते. म्हणजे आपल्या परिचयाचे नव्हते. एक प्रकारे राजकीय व सामाजिक स्फोटांचा (Social explosion) हा काळ आहे. आपल्यांतील मतभेद वर आलेले आणि पूर्वीचे भारतीय नेतृत्व गेलेले, अशा या काळात वावरताना स्वाभाविकच बावरल्यासारखे होते. आपल्या मनात विभूतिमत्त्वाची, पुरुषावताराची कल्पना कोठे तरी घर करून बसली आहे. त्यामुळे राजकीय नेतृत्वाकडे या दृष्टीने आपण पाहतो, ते साफ चूक आहे.
मला वाटते, की राजकारण आणि राजकीय नेतृत्व लोकव्यवहार आहे. त्यात सत्ता मिळविण्यासाठी स्पर्धा ही चालणार आहे. प्रभावी पुढारी आपल्या विचारसरणीचे, आपल्या कार्यक्रमाचा आग्रह धरणारे गट करणार, हेही आता उघड आहे. सत्ता मिळविणे किंवा तिची अभिलाषा धरणे, म्हणजे काही तरी पाप आहे, असे मानणारे लोक राजकारण करू शकणार नाहीत. कोणता तरी गट अडचणीत सापडला, की दुसरा गट पुढे येणार. सत्तासंक्रमण हे आता असेच होत राहणार. म्हणून गटबाजीचे राजकारण इत्यादी शब्द छद्मी अर्थाने आपण वापरतो, ते आता सोडून द्यावे लागेल. जगात सर्वत्र असेच चालले आहे. भारतातही त्याला अपवाद आढळणार नाही. अर्थात वैयक्तिक हेव्यादाव्यांसाठी उभारलेले गट हे केव्हाही निंद्य व त्याज्य समजावे लागतील.
दुसरा मुद्दा प्रादेशिक नेतृत्व आणि राष्ट्रिय नेतृत्व यांच्या निर्मितीचा आहे. राजकारणाचा पहिला संबंध एवढ्या प्रचंड देशात एकदम अखिल भारतीय पातळीवर येणे कठीण असते. म्हणून गाव, तालुका, जिल्हा, राज्य या ठिकाणी माणसे राजकारणात भाग घेऊ लागतील आणि तेथूनच ती वर जातील. मी स्वत: राजकारणात पडलो, तो स्थानिक पातळीवरच. कल्पनाही नसताना मला राष्ट्रिय पातळीवर यावे लागले. तसेच आता होत राहील.
राष्ट्रिय नेतृत्व आता प्रदेशातून चांगली माणसे आणून रुजवावे लागेल. विद्यमान कर्तृत्ववान नेत्यांपैकीच कोणाला तरी पुढे करून हे भारतीय सामूहिक नेतृत्व निर्माण केले जाईल. म्हणून गांधी-नेहरूंच्या काळातील राष्ट्रिय नेतृत्वाच्या कल्पना आता आपल्याला बदलाव्या लागतील.