• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (154)

महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे, की मी अगदी गरीब स्थितीत असताना शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी गाव सोडून बाहेर जावे लागले. परंतु जेथे गेलो, तेथे राहण्यासाठी वसतिगृह निश्चित करताना मी दहा वेळा विचार केला. परंतु जातीय नावावर चालणा-या वसतिगृहात शिक्षणासाठी राहायचे काय, असा सवाल माझ्यासमोर निर्माण झाला आणि अखेरीस अशा वसतिगृहात राहायचे माझ्या मनाने नाकारले. जिथे कुठे लहान खोली मिळाली, तिथे राहिलो आणि शिक्षण घेतले. योगायोग असा, की त्या लहान खोलीत मला जोडीदार मिळाला, तोही एक माझा ब्राह्मण मित्रच होता.

हा उल्लेख मी एवढ्यासाठी करीत आहे, की जातीयवादाचा विषारी विचार लहानपणापासूनच मला कधी शिवला नाही. माझा तर असा दावा आहे, की महाराष्ट्रात आणि अन्यत्रही समाजातील सर्व वर्गांतील लोकांशी माझे व्यक्तिश: जिव्हाळ्याचे आणि घरोब्याचे संबंध आहेत. गरीब घरांतल्या शेतकऱ्यांशी, हरिजन वर्गातल्या मंडळींशी जेवढे माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तेवढेच पुढारलेल्या ब्राह्मण वर्गातील लोकांशीही आहेत. जनसंघ आणि रा. स्व. संघ यांच्याशी राजकीय दृष्ट्या मतभेद असले, तरी त्यांच्यापैकी अनेकांशी व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. इतकेच कशाला, मनातले दु:ख कुणाला सांगायचे ठरवले, तर चारांतले तीन ब्राह्मण असतात. हरिजन, मुसलमान, लिंगायत, ब्राह्मण अशा साऱ्यांच जातीजमातींबद्दल माझ्या मनात काही जिव्हाळ्याच्या भावना आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्रात कोणी जातीयवाद फैलावण्याचा प्रयत्न करणार असतील, तर जीव पणाला लावून महाराष्ट्रातील जातीयवादाविरुद्ध मी उभा राहीन, असा माझा निर्धार आहे.

थोडे मागे वळून पाहिले किंवा इतिहासाची पाने उलटली, तर रा. स्व. संघावर टीका करणारे कोण आढळतात? रा. स्व. संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे. ही टीका प्रथम राष्ट्रसेवा दलाच्या गोटातूनच केली गेलेली आहे. राष्ट्रसेवा दलाच्या मार्गदर्शकांना ही माहिती असावी. असलीच पाहिजे.

या उलट, रा. स्व. संघाचे महाराष्ट्रातले आणि बाहेरचेही स्वरूप मी पाहिले आहे. त्यामुळे या संघटनेत एकाच जातीचे लोक आहेत, असे मी म्हणू शकत नाही. जनसंघाचेही तेच आहे. समाजातले निरनिराळे वर्ग त्यात आहेत, याचीही मला माहिती आहे. व्यक्तिगत उल्लेख करायचा, तर पुण्यात, मी जेव्हा वकिलीचा अभ्यास करायला आलो, त्यावेळी लॉ कॉलेजसमोर, जिथे मी राहात असे, तेथे माझा 'रुम पार्टनर' हा रा. स्व. संघाचा एक सचोटीचा कार्यकर्ता होता. माझ्या मित्रमंडळींतही अशांचा भरणा होता. तेव्हा संघ-जनसंघावरील माझी टीका म्हणजे ब्राह्मण वर्गावर किंवा जातीवर टीका, असे भासविण्याचा प्रयत्न जेव्हा माझ्या बाबतीत होतो, तेव्हा त्याचे मला हसू येते.