• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (134)

२४. जागतिक शांततेचे एकसंध स्वरूप

संयुक्त राष्ट्रसंघ महासमितीच्या ३१ व्या
अधिवेशनामध्ये ४ ऑक्टोबर १९७६ रोजी

परराष्ट्रमंत्री या नात्याने केलेल्या भाषणाच्या आधारे.
संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाल्याला आता तीस वर्षे होत आहेत. या तीस वर्षांच्या कालावधीत जागतिक राजकारणामध्ये अनेक बदल घडून आलेले आहेत. दोन महासत्तांमधील शीतयुद्धाचा काळही या संघटनेने पाहिला आहे आणि या महासत्ता समंजसपणाच्या पर्वात प्रवेश करीत आहेत, हेही संयुक्त राष्ट्रसंघ पाहात आहे. जगात जेथे जेथे प्रत्यक्ष संघर्षाची परिस्थिती उद्भवली, तेथे ही परिस्थिती निवळावी, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घेतला. त्यामुळे शांतता-रक्षणाच्या कार्यात या संघटनेला उपयुक्त अनुभव मिळू शकला. वसाहतवादाचे जोखड फेकून देऊन अनेक देश या कालखंडात स्वतंत्र झाले. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाची सदस्यसंख्या भराभर वाढत गेली.

शांतता, न्याय आणि जगातील प्रत्येक माणसाला विकासाची संपूर्ण संधी हे संयुक्त राष्ट्रसंघाचे अभिवचन आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये जगात एक शांततामय क्रांती घडून आली आहे, हे संयुक्त राष्ट्रसंघाचे आत्तापर्यंतचे विविध प्रश्नांसंबंधीचे प्रस्ताव पाहिले, तर कळून येते. ही क्रांती मुख्यत: शांतता कशा प्रकारची असावी, या संबंधीच्या आणि भविष्यकाळात सर्व मानवमात्राचे जीवन कशा प्रकारचे असावे, यासंबंधीच्या क्षेत्रात घडून आलेली आहे.

प्रचलित प्रश्न आणि वाद हाताळणे, हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक प्रमुख कार्य झाले आहे. यांपैकी काही प्रश्न असे असतात, की जे संबंधित देशांना संयुक्त राष्ट्रसंघाबाहेरही सोडविता येऊ शकतात. म्हणून भविष्यकालीन प्रश्न समर्थपणे सोडवू शकणारी संघटना, हे संयुक्त राष्ट्रसंघाचे स्वरूप टिकवायचे असेल, तर राष्ट्रसंघाच्या सनदेनुसार आपापसांत सोडविता येण्यासारख्या प्रश्नांचा बोजा आपण या संघटनेवर टाकता कामा नये, असे आपण मानले पाहिजे. कारण, सर्व देशांनी आपापले वाद आंतरराष्ट्रिय शांतता, सुरक्षितता आणि न्याय यांना धोका निर्माण होणार नाही, अशी काळजी घेऊन आपापसांत शांततेने सोडवावेत, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेतील दुस-या कलमातील तिस-या परिच्छेदात म्हटले आहे.

याउलट, काही प्रश्न असे असतात, की त्यांचा अनेक देशांशी संबंध येतो आणि म्हणून ते सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीची अपरिहार्य गरज भासते. परंतु अशा प्रश्नांच्या बाबतीतही अखेरीस असे आढळून येते, की संबंधित देशांनाच एकत्र येऊन परस्परांच्या विचारविनिमयातून सन्माननीय तडजोड शोधून काढावी लागते. ब-याच प्रश्नांच्या बाबतीत प्रारंभीच्या काळात तरी ही वस्तुथिती विसरली जाते. त्यामुळे साहजिकच संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्षमतेबद्दल अकारणच संशय व्यक्त होत असतो.