• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (122)

नेहरू ज्या तिस-या युगाचे जनक होते, यासंबंधी लिहिताना मार्टिन ल्यूथर किंग (ज्यूनियर) म्हणतात:

'हे तिसरे युग नेहरूंच्या निधनानंतर अवतरत आहे. त्यांचे पार्थिव शरीर जरी पंचत्वात विलीन झाले असले, तरी त्या व्यक्तित्वाचा आध्यात्मिक आशय आजही तितकाच चैतन्यशाली आहे. महासत्तांनी परस्परांशी अजून सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केलेले नाहीत, हे खरे असले, तरी आपल्या महत्त्वाकांक्षेवर नियंत्रण कसे घालायचे, हे त्यांनी अलिप्ततावादी जगाच्या मदतीने जाणून घेतले आहे. या संयमावरच चिरस्थायी सामंजस्य नांदणार आहे. शांततामय सहजीवनावरील नेहरूंची दृढ श्रद्धा आणि या श्रद्धेला त्यांनी दिलेले कृतिरूप हाच मानवजातीस लाभलेला तेजस्वी आशाकिरण आहे.'

आपल्या परराष्ट्रिय धोरणाचा हाच खराखुरा आधार आहे. अलिप्ततावादाची संकल्पना, वसाहतवादविरोधी संकल्पना, साम्राज्यवादविरोधी संकल्पना, शांततेसाठी प्रयत्नशील असण्याची आणि त्याचबरोबर शांततामय सहजीवनाचा पुरस्कार करण्याची संकल्पना या सगळ्या संकल्पना त्या मूलभूत परराष्ट्रिय धोरणाचे आंतरराष्ट्रिय अविष्कार ठरतात.

आपण आपापसांत सामंजस्य निर्माण करावे, असे आता महासत्तांना वाटू लागले आहे, यामागे बरीच कारणे आहेत. विकसनशील अलिप्ततावादी देशांनी आंतरराष्ट्रिय राजकारणामध्ये आपले स्वत:चे असे वेगळे स्थान आणि सामर्थ्य निर्माण केले आहे. आंतरराष्ट्रिय परिस्थितीला एक वेगळी दिशा दिलेली आहे. हे त्यांपैकी एक प्रमुख कारण आहे. दुसरे असे, की तांत्रिक प्रगतीनेही ते अपरिहार्य केले आहे. आपणच सर्वांत शक्तिशाली आहोत, असा दावा कोणालाही करता येणार नाही. इतक्या प्रमाणामध्ये सर्वत्र तांत्रिक प्रगती झालेली दिसून येते.

'द्विकेंद्रात्मक' किंवा 'त्रिकेंद्रात्मक' किंवा 'पंचकेंद्रात्मक' अशा शब्दांनी सध्या काहीजण जागतिक परिस्थितीचे वर्णन करतात. ही अशी केंद्रे किती आहेत, ते मला माहीत नाही. आपल्याला मूलत: दोनच केंद्रे दिसतात. आता जर युद्ध झाले, तर ते अण्वस्त्रांचेच राहणार असल्यामुळे कोणालाही विजय मिळणे अशक्य आहे, हे या दोन्ही केंद्रांनाही कळून चुकलेले आहे. त्यामुळे त्यांना परस्परांशी समझोता करण्यावाचून गत्यंतरच उरलेले नाही. वस्तुस्थिती अशी आहे, की तंत्रविज्ञानातील क्रांतीमुळे आंतरराष्ट्रिय क्षेत्रामध्ये काही अपरिहार्य राजकीय मर्यादा निर्माण झालेल्या आहेत. आपल्याजवळील संहारक अस्त्रांचा आपण उपयोग करूच शकत नाही, याची कमालीची जाणीव प्रभावी शस्त्रास्त्रे बाळगणा-या महासत्तांना झालेली आहे. ही त्यांपैकीच एक मर्यादा होय.

त्यामुळे सामंजस्य ही एक चांगली घटना आहे, असे आपण म्हणत असलो आणि तिचे स्वागत करीत असलो, तरी हे सामंजस्य एका विशिष्ट खंडापुरतेच किंवा एका विविक्षित परिस्थितीपुरते मर्यादित राहता कामा नये, असेही आपण प्रतिपादन करतो. केवळ एखादा पेचप्रसंग टाळण्याचे तंत्र म्हणून समझोत्याचा अवलंब केला जाऊ नये;  तर जगातील सर्व खंडांना, सर्व परिस्थितींना आणि सर्व तणावांना समाविष्ट करण्याइतकी खरीखुरी क्षमता त्यात यावयास हवी, यावर आपला भर आहे. त्यामुळे आपण जेव्हा अलिप्ततावादाचा विचार करतो, तेव्हा आपण अलिप्ततेचा अधिक विधायक विचार केला पाहिजे, असे मला वाटते.