• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (112)

शांततेचे जतन हे आपले सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे. म्हणून शांततेत बिघाड आणणा-या प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य मिळायला हवे. ब-याच वर्षांच्या युद्धांनंतर इंडोचीनमध्ये आता शांतता प्रस्थापित झालेली आहे. त्यामुळे सर्वांनाच समाधान वाटणे स्वाभाविक आहे. परंतु काहीजणांच्या डोक्यातून अजूनही भूतकाळ गेलेला दिसत नाही. व्हिएटनामी लोकशाहीवादी प्रजासत्ताक आणि दक्षिण व्हिएटनामी प्रजासत्ताक यांचे संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश करण्यासंबंधीचे अर्ज सुरक्षा समितीन फेटाळून लावले, ही दु:खाची बाब आहे. या संघटनेत दाखल व्हायला ते दोन्ही देश पात्र असताना खरे म्हणजे आपण त्यांचे स्वागत करायला हवे. त्यांच्या सहकार्याचा संयुक्त राष्ट्रसंघाला लाभच होईल. इंडोचीनमधील देशांचे युद्धामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्यांची आर्थिक पुनर्रचना करण्यासाठी सर्व देशांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. या बाबतीतील आपली जबाबदारी पार पाडायला भारत तयार आहे.

पश्चिम आशियातील परिस्थिती अजूनही स्फोटक आहे. आक्रमण करून जिंकलेले अरब प्रदेश इस्त्रायलने सोडून दिल्याशिवाय आणि पॅलेस्टाईनमधील अरबांचे न्याय्य अधिकार मान्य केल्याशिवाय पश्चिम आशियात चिरस्थायी शांतता नांदणार नाही. मध्यंतरीच्या काळात, सिनायमधून इस्त्रायलने मर्यादित माघार घेण्याबाबत इजिप्त आणि इस्त्रायल यांच्यांत करार झालेला आहे. या करारामुळे त्या विभागातील तणाव कमी झाला आणि मूलभूत प्रश्न सुटायला मदत झाली, तर हा करार महत्त्वपूर्ण ठरेल. व्याप्त अरब प्रदेशांतून इस्त्रायलने माघार घ्यावी, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व प्रयत्न करणे त्याच्या सनदेशी आणि सुरक्षा समितीने वेळोवेळी केलेल्या ठरावांशी सुसंगतच ठरणार आहे. त्याचप्रमाणे पॅलेस्टाईनमधील अरबांना त्यांचे न्याय्य अधिकार प्राप्त होतील, असाही आपण प्रयत्न केला पाहिजे. अरब देशांनी आपली एकजूट कायम राखली, आणि त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाकडून सतत पाठिंबा मिळत गेला, तर त्यांना आपले प्रदेश परत मिळविणे आणि पॅलेस्टाईनी जनतेस न्याय्य अधिकार प्राप्त होणे मुळीच कठीण जाणार नाही, असे मला वाटते.

पोर्तुगालच्या आफ्रिकेतील साम्राज्याचा झपाट्याने विलय होत चालला आहे. आफ्रिकेतील मुक्ति-आंदोलनांना हे यश लाभल्याबद्दल सर्वांनाच समाधान वाटत आहे. परंतु राष्ट्रिय स्वातंत्र्य संपादन करण्याचा आफ्रिकी देशांचा लढा अजूनही संपलेला नाही. म्हणून आफ्रिकेतील जे देश अजूनही गुलामीत राहत आहेत, त्यांच्या मुक्ति-आंदोलनांना गती कशी लाभेल, याचा आपण विचार केला पाहिजे.

अंगोलामध्ये स्वातंत्र्य मिळताच अंतर्गत संघर्ष निर्माण व्हावा, ही सगळ्यांच्याच दृष्टीने चिंतेची बाब आहे. कारण सत्तेसाठी सुरू झालेल्या या संघर्षाची झळ अखेरीस तेथील जनतेलाच सहन करावी लागणार आहे. अंगोलामधील निरनिराळ्या गटांमध्ये शांतता आणि सहकार्य प्रस्थापित करण्याच्या कार्यात आफ्रिकी ऐक्य-संघटनेला यश येईल, अशी आशा आहे.