पाकिस्तानला भारताच्या तयारीचाही विचार करावा लागेल. १९६२ मध्ये चीनने आपल्यावर आक्रमण केले. १९६५ मध्ये पाकिस्तानी आक्रमणाचा अनुभव घ्यावा लागला. १९६६-६७ मध्ये हे दोन्ही देश पुन्हा आक्रमण करतील काय, हे सांगणे कठीण आहे. अर्थात हे सांगून मला युद्धानुकूल वातावरण निर्माण करायचे नाही, हे सांगितलेच पाहिजे. भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केलेला आहे. मी फक्त, शक्यता काय आहे, याचे विवेचन केले. युद्ध होणार आहे किंवा युद्ध झालेच पाहिजे, असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. युद्धे कधीच घडता कामा नयेत, अशीच आपली भूमिका आहे. परंतु केवळ आपण तशी इच्छा करून काहीच साध्य होणार नाही. इतर देशांचीही तशीच इच्छा असेल, तरच ही अपेक्षा फलद्रूप होऊ शकेल. आपल्याला मैत्री आणि शांतता हवी आहे, अशी प्रतिपक्षाकडून ग्वाही मिळायला हवी. तशी ग्वाही जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याइतकी सिद्धता केलीच पाहिजे.
संरक्षणक्षम व्हायचे, याचा अर्थ अंगावर गणवेश चढवून आघाडीवर जायचे, असा करून चालणार नाही. काही थोडे लोकच पायदलात किंवा नौदलात किंवा हवाईदलात जाऊ शकतात. सारा देश आपल्या पाठीशी उभा आहे, याची त्या लोकांना खात्री झाली, तरच ते चांगल्या तऱ्हेने लढू शकतात. पाकिस्तानबरोबरच्या युद्धात आपल्या जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी मर्दुमकीचे चांगले दर्शन घडविले. ते एवढ्या शर्थीने का लढले? आपण जर जिद्दीने लढलो नाही, तर आपल्या देशाची अप्रतिष्ठा होईल, आपल्या लष्कराचे नाव खराब होईल, आपल्या देशाच्या सन्मानाला बट्टा लागेल आणि एका स्वतंत्र देशाचे आपण नागरिक आहोत, असे आपल्याला अभिमानाने म्हणता येणार नाही, याची त्यांना जाणीव होती. स्वातंत्र्यापूर्वी लष्कर आणि जनता यांच्यांत अद्वैत नव्हते. लष्कर वेगळे आणि लोक वेगळे अशी परिस्थिती होती. आज ती अवस्था राहिलेली नाही. लष्कर हा जनतेचाच एक भाग झालेला आहे. पायदलात किंवा नौदलात किंवा हवाईदलात काम करणा-या प्रत्येकाला हे माहिती आहे, की आपला दुसरा भाऊ कारखान्यात किंवा शेतात, शहरात किंवा खेड्यात देशासाठीच काम करीत असून त्याच्यात आणि आपल्यात अभिन्न नाते आहे. आजचा सैनिक स्वत:साठी लढत नाही. तो देशासाठी लढत असतो. जीवनाला कंटाळला, म्हणून तो आघाडीवर मरायला तयार झालेला नाही. ती सर्व मुले तरुण होती, बुद्धिमान होती. त्यांची प्रकृती चांगली होती. त्यांच्यापुढे उज्ज्वल भवितव्य उभे होते. आणि तरीही त्यांची आत्मबलिदानाला सिद्धता होती. मरणाचा विचार त्यांच्या मनाला स्पर्शूच शकला नाही. देश जिवंत राहावा, म्हणून हे तरुण सैनिक मृत्यूला सामोरे गेले.
देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने आघाडीवर जायची जरूर नाही. लष्कराला शस्त्रास्त्रे लागतात, आणखीही ब-याच गोष्टींची जरूरी भासते. देशाला ती साधने पुरविता यावीत, अशी परिस्थिती निर्माण करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण उत्पादन-क्षेत्रात काय करतो, आर्थिक प्रगती किती घडवून आणतो, याचा यासाठी विचार करायला हवा. कारण तीच गोष्ट महत्त्वाची आहे. आपली आर्थिक प्रगती होऊ नये, तिच्यात अडथळा यावा, हाच नेमका चीनच्या आक्रमणाचा हेतू होता.
भारतात भाषेवरून, प्रदेशावरून, धर्मावरून भांडणे आहेत. त्यामुळे अशा या फुटीर देशाला आपण एक धक्का दिला, की तो जगाच्या नकाशावरून उडून जाईल, असे चीनला वाटत होते. भारतासंबंधीचे हे विश्लेषण चुकीचे आहे, हे आपण दाखवून दिले पाहिजे. दोनदा आपण तसे करून दाखविले आहे. तसा प्रसंग पुन्हा आला, तर जुना फुटीर भारत आता राहिलेला नाही, आता भारतीय जनता एकदिलाने उभी आहे, हे आपण दाखवून देऊ, यासंबंधी मला शंका नाही. नवभारत लोकशाहीवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे आणि या मूल्यांसाठी तो लढायला कधीही मागेपुढे पाहणार नाही.