शिक्षणाने देशात बेकारीच निर्माण होणार असेल, तर देशामध्ये सुशिक्षित बेकार असणे अधिक चांगले असे मी म्हणेन. कारण सुशिक्षित बेकार निदान विचार तरी करू शकेल. आपण बेकार का राहिलो याची तो कारणपरंपरा शोधील आणि ती दूर करण्याचा तो प्रयत्न करील. तेव्हा शिक्षणाने सुशिक्षित बेकारांचा धोका निर्माण होईल या शंकेत काही अर्थ नाही.
शिक्षणाने एक प्रकारचे मानसिक व बौध्दिक सामर्थ्य निर्माण झाले पाहिजे. एवढेच नव्हे, तर या बौध्दिक व मानसिक सामर्थ्याच्या जोरावर आपल्या जीवनाचा यशस्वी मार्ग आपण शोधून काढीत असताना, ज्या समाजाने आपल्या कल्याणासाठी या ज्ञानगंगा उघडल्या, त्या समाजाचेही थोडेफार ऋण फेडण्याची शक्ती व भावना या शिक्षणाने आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे.
शिक्षण व शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव यामुळे आपल्याला जीवनाच्या सर्व क्षेत्रांत माघार घ्यावी लागते. याउलट शास्त्रीय वैज्ञानिक ज्ञानाने युक्त अशी राष्ट्रे स्वत:चे सार्वभौमत्व अखंड ठेवू शकतात. इतकेच नव्हे, तर दुस-यांच्याही मदतीला धावून जाऊ शकतात.
असत्यापासून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृत्यूपासून अमृताकडे मला ने. या अमृतत्त्वाच्या प्राप्तीसाठी देवांनी समुद्रमंथन केले; पण समुद्रमंथनातून जे अमृत निघाले ते देव प्राशन करून बसले आता आमच्यासाठी अमृत शिल्लकच राहिलेले नाही, म्हणून आता ज्ञान हेच अमृत आहे. या अमृताने तुम्हाला समर्थ बनवयाचे आहे, समाजजीवन समर्थ बनवायचे आहे.
वयच केवळ नव्हे, तर आपल्यापुढील आव्हान स्वीकारून त्याला तोंड देण्याची कुवत हे पण मी तारूण्याचे गमक मानतो. खरे म्हणजे माणूस तरूण आहे की वृध्द आहे याची कसोटी त्यावरच ठरते. लोकमान्य टिळक प्रीव्ही कौन्सिलात आपला खटला हरल्यानंतर, “या पराभवानं तुमचं मनोधैर्य खचलं का?” असे त्यांना कोणीसे विचारले. त्यावर टिळकांनी उत्तर दिले, “माझं धैर्य कदापि खचणार नाही. मी ज्या पिढीत वाढलो, त्या पिढीवर आकाश जरी कोसळलं, तरी त्या कोसळलेल्या आकाशावर पाय रोवून ती उभी राहील आणि लढत देईल.” टिळकांचे हे तेजस्वी उदगार आमच्या तरूणांचे ब्रीदवाक्य झाले पाहिजे.
आपण ज्ञानीही व्हा व शहाणेही व्हा. ज्ञानात आणि शहाणपणात फरक आहे असे सुचविलेले आहे. शास्त्रांचे ज्ञान तत्त्वाच्या दृष्टीने करून घेणे अत्यंत आवश्यक असते. परंतु त्या ज्ञानाचा समाजजीवनात उपयोग करून घेण्याचे जे शास्त्र आहे, त्याचे नाव शहाणपण असे मी समजतो. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर ज्ञानाबरोबरच हे शहाणपण मिळवावे लागणार आहे. कारण या शहाणपणाची देशाला आज फार गरज आहे.
शिक्षण संपल्यानंतर नोकरी करणार नाही अशी प्रतिज्ञा करा. बुध्दी व हात यांचा उपयोग करा. शौर्याला आम्ही कमी पडलो नाही तर शास्त्राला कमी पडलो. नव्या आकांक्षांनी पेटलेले तरूण आता पुढे आले पाहिजेत. कर्तृत्त्वाचे पीकच महाराष्ट्रात उभे राहिले पाहिजे. गुणी व बुध्दिमान असा महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे. नवीन घडणारा महाराष्ट्र ‘Sky is the limit’ असा आदर्श ठेवणारा होवो.