सांस्कृतिक
राम आणि कृष्ण हे अवतारी पुरूष होते असे आपण मानतो. पण व्यासांनी आणि वाल्मिकींनी मनात आणले नसते, तर राम आणि कृष्ण हे महापुरूषसुध्दा आज कुठे असते परमेश्वरालाच माहीत! त्यांचे उत्तुंग जीवन शब्दबध्द करण्यासाठी व्यासांची आणि वाल्मिकींची प्रतिभा फुलावी लागली.
कुठलाही महाकवी किंवा कुठलाही कवी, निव्वळ शब्दांचा जुळारी होऊन कवी होऊ शकत नाही. नादमाधुर्य म्हणजेच काव्य असे आपणाला म्हणता येणार नाही. आपल्या मराठी वाङ्मयामध्येही असा एक काळ होता की, ज्या वेळी शब्दलालित्य म्हणजेच साहित्य असे समजून अशा साहित्यामागे लोक धाव घेत; परंतु निव्वळ नादमाधुर्यातूनच निर्माण होणा-या काव्यात जनतेचे मन काबीज करण्याचे सामर्थ्य होऊ शकत नाही. त्या जुळणा-या सुदंर नादमधुर शब्दांच्या पाठीमागे एक नवा सामर्थ्यवान संदेश देणारे मन आणि विचार असल्याशिवाय कवी किंवा महाकवी निर्माण होऊ शकत नाहीत.
वर्तमानकाळ समजण्यासाठी इतिहासाचे सतत चिंतन करावे लागते. कारण वर्तमानकाळाशी झगडणा-या माणसाला भूतकाळ समजण्याची जर अक्कळ नसेल, तर वर्तमानकाळाशी तो फारसा झगडू शकणार नाही.
भावनांना व्यक्तीच्या जीवनात जितके महत्त्व असते, तितके ते संस्थेच्या जीवनीतही असते असे मात्र नाही. संस्थेच्या जीवनात भावनेपेक्षाही कार्यालाच अधिक महत्त्व असते.
माझ्या मते भाषांतरी भाषा फारशी चांगली नसते. जमिनीतले पाणी, जमिनीतली सत्त्वे आणि जमिनीत इतर जी काही शक्ती असेल, ती घेऊन पिऊन जमिनीतून ऊस जसजसा वाढत जातो तशी भाषा ही जिंवत असली पाहिजे. मराठी भाषेने मराठी मनाचा कस घेऊनच वाढले पाहिजे. तरच ख-या अर्थाने मराठी भाषा वाढेल, अधिकाधिक उत्कर्ष पावेल.
मी भाषेवर प्रेम करणारा मनुष्य आहे. पण मी भाषेचा संकुचित अर्थाने अभिमानी राहिलेलो नाही, हेही तितकेच खरे आहे. भाषा ही माणसांना एकत्र आणण्याचे साधन बनण्याऐवजी त्यांच्यात ती दुरावा निर्माण करील की काय, अशी आज आपल्याला भीती वाटू लागली आहे.
गोड लाडू हातामध्ये दिला, तो सगळा लाडू गोड असतो आणि त्याचा लहानसा तुकडाही गोडच असतो. लाडवामध्ये जे गुणधर्म असतील ते त्याच्या लहानशा कणामध्येही असले पाहिजेत. साखरेचा लहानसा कण तोंडात टाकला तरी तो गोड लागतो आणि मूठभर साखर तोंडामध्ये टाकली तरी ती गोड लागते. त्याचप्रमाणे राष्ट्रामध्ये जे काही चांगले गुण असतील ते त्याच्या लहान स्वरूपात, म्हणजे त्यातल्या गावात, शहरातही दिसले पाहिजेत.
या देशाने श्रीकृष्ण निर्माण केले आहेत, ज्ञानेश्वर निर्माण केले आहेत, सी. व्ही. रमण निर्माण केले आहेत आणि नारळीकर निर्माण केले आहेत. फार प्राचीन काळापासून ते अगदी आजपर्यंत आमच्यामध्ये हे सामर्थ्य आहे. याचा पडताळा आम्हांस अनेक वेळा आलेला आहे. परंतु या सामर्थ्याचा आम्ही उपयोग केलेला नाही. रंगभूमी हाही आपल्या जीवनाचाच एक भाग आहे. आपले जीवन, आपला समाज जसजसा बदलत जाईल त्याप्रमाणे रंगभूमीही बदलत जाणे अपरिहार्य आहे. आता रंगभूमीवर साडी नेसून पुरूष कधीही येऊ शकणार नाहीत. तेव्हा नेसलेला बालगंधर्वांसारखा नट पुन्हा रंगभूमीवर दिसणार नाही, म्हणून उगाच हळहळण्यात काय अर्थ आहे?