आज येथे मुर्दाबाद म्हणणारी जी काही माणसे आहेत, त्यांना आपण गडबड न करता ते म्हणण्याची परवानगी द्या. कारण, अगदी न्यायाचा तराजू हातात धरून आज मी माझे स्वत:चे वजन करून घेणार आहे. मला मिळालेल्या झिंदाबादचेही मी वजन करणार आहे आणि मुर्दाबादचेही वजन करणार आहे. शेवटी जे माझ्या पदरात राहील, तेवढेच माझे म्हणून शिल्लक राहणार आहे. लोकांनी काही हार घातले म्हणून मी फार बिघडून गेलेलो नाही, किंवा कोणी मुर्दाबाद म्हटल्याने बिघडून जाणार नाही. मुर्दाबाद म्हणणा-यांना माझे धन्यवाद आहेत. कारण, मुर्दाबाद म्हणणाराही माझी आठवण करतो, असाच त्याचा खरा अर्थ आहे. या मुर्दाबादच्या घोषणेतून मी फार वेळा गेलो आहे. आगीतून जाण्याची मला सवय आहे. मुर्दाबाद म्हणणारे जितके जास्त मुर्दाबाद म्हणतात, तितका माझा जास्त विजय होतो, असा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे.
कुठल्याही राजकीय पक्षामध्ये थोडेच लोक असतात. बहुसंख्य जनता ही पक्षाच्या बाहेर असते, असे माझे स्वत:चे मत आहे. आणखी ती काही अमक्याच एका पक्षाला बांधली गेलेले असते, असेही नाही. आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे, हे या जनतेला पटविण्याची जबाबदारी त्या त्या पक्षावर असते. जो पक्ष हे करतो, तो राजकारणामध्ये यशस्वी होतो असा आतापर्यंचा अनुभव आहे.
आमचे काही विरोधी मित्र, छोट्या-छोट्या प्रश्नाची दुखणी घेऊन त्यांचा महाराष्ट्रभर बाजार मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांना मला सांगावयाचे आहे की, या छोट्या-छोट्या प्रश्नांच्या चिंध्या जमविण्यासाठी आपण जेवढा वेळ खर्च करीत आहात; त्यांपेकी निम्मा वेळ तरी महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने आज ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत, त्यांच्या विचारासाठी द्या.
“व्हेनेवर इन डाऊट, प्ले दी ट्रम्प” असा नियम आहे. राजकारणामध्ये आणि देशाच्या जीवनामध्ये जेव्हा संभ्रम निर्माण होतो, तेव्हा आपण हुकमाचा पत्ता हातात घेतला पाहिजे आणि आपला हा हुकमाचा पत्ता, म्हणजे आपली मूलभूत तत्त्वे आणि आपले मूलभूत सिध्दांत.
मी मागे युध्दाच्या काळात एक व्यंगचित्र पाहिले होते. कोणाबद्दलचे होते ते मी सांगत नाही. या व्यंगचित्रामध्ये जो प्रमुख आहे, त्याने सैन्याला “क्विक मार्च” म्हणून ऑर्डर केली आहे. त्याप्रमाणे सैन्य चालू लागते आणि प्रवास करीत करीत ते समोर असलेल्या एका कड्यापर्यंत येऊन पोहोचते. एक माणूस त्या प्रमुखाला सांगितो की, “सैन्य कड्यापर्यंत पोहोचले आहे, आता पुढची ऑर्डर द्या.” तो प्रमुख ऑर्डर देतो, “गडबाय.” आपले सैनिक कोणत्या तरी खड्ड्यात जाऊन पडण्यासाठी “गुडबाय” ऑर्डर देणारा मी सेनापती नाही. मला जनतेचे प्रश्न सोडवावयाचे आहेत. जिथपर्यंत जाणे शक्य असेल, तेवढ्याच मर्यादेपर्यंत जाण्याचा मार्ग मला स्वीकारला पाहिजे.
जनतेला सांगितले पाहिजे की, तू राजा आहेस. अविकसित, दुष्काळी अशा कडेकपारीच्या बनलेल्या सह्याद्रीचा तू राजा आहेस. दु:खात असलेल्या जनतेच्या जीवनावर सुखाची सावली निर्माण करणे हे राजाचे कार्य प्रत्येक मराठी माणसाने केले पाहिजे. एकेक माणूस, एकेक लहान मूल हे सावली देणारे झाड आहे, असे मानून खतपाणी घातले पाहिजे.
श्रेय मागून कुणी देत नाही आणि असलेले कोणी हिरावून घेतो म्हटले, तरी घेऊ शकत नाही.
महाराष्ट्राच्या चार प्रवृती आहेत असे मी मानतो. ज्ञानेश्वरांच्या रूपाने संतप्रवृत्ती, शिवाजींच्या रूपाने पराक्रम, महात्मा जोतिबा फुले यांच्या रूपाने स्वार्थत्याग आणि लोकमान्य टिळकांच्या रूपाने विव्दत्ता व राजकारण महाराष्ट्रापुढे उभे आहे.