१०. अखंड विचारा झरा
प्रभावी वक्ता
यशवंतराव चव्हाणांसारखे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला लाभल्यानेच देशात महाराष्ट्र राज्य आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रस्थानावर पोहोचले. राजकारणात असलेला एक महान तत्त्वचिंतक म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. साहित्यावर भरभरून प्रेम करणा-या यशवंतरावांनी कलाकारांनाही राजाश्रय दिला. त्यांची विविध विषयावरील भाषणे खूपच गाजली. त्यांच्यासारखे सभा जिंकण्याचे कौशल्य असणारा त्यांच्या तोडीचा नेता शोधून सापडणे ही केवळ अशक्य. प्रचंड वाचनामुळे त्यांचे ज्ञानही सर्वस्पर्शी होते. कोणत्याही जटील प्रश्नांवर सहजपणे प्रतिक्रिया व्यक्त करून चुटकी सरशी ती समस्या सोडविण्याची होतोटी यशवंतरावांकडे होती. त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असत. पल्लेदार वाक्यरचना हे त्यांच्या भाषणाचे आणखी एक वैशिष्ट्य. स्पष्टवक्तेपणा, मांडणीतली सरळपणा व सहजता यामुळे त्यांच्याबद्द्ल जनतेत प्रचंड विश्वासार्हता होती. जनतेशी असणारा थेट संपर्क व प्रचंड लोकप्रियता यशवंतरावांइतकी अन्य कुणा नेत्याला लाभली नाही. छोडो भारत आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व राजकीय पटलावरील त्यांची भाषणे खूप गाजली.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा काळ नजिक आला होता. त्यावेळी दि. ५ व ६ जानेवारी, १९६० रोजी यशवंतरावांचे भाषण मिरज व सांगली येथे झाले. या भाषणात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमागील आपले मत मांडताना यशवंतराव म्हणतात,
“आपणांस सर्वच काही मनासारखे सदैव भेटत गेले असते, तर आपण सर्वच जण राजे झालो असतो. आपण महाराष्ट्र मागितला. तो कसा हवा याबाबत नकाशे मांडले. आज सर्व प्रमुख मागण्यासह महाराष्ट्र निर्माण होत आहे. कांही मंडळी जे मिळाले आहे ते जाणून घेण्यापेक्षा व आपला विजय होत आहे ते ओळखण्यापेक्षा जे कोठे लहानसे मिळालेले नाही त्याचा जप करीत बसली आहेत. मला त्यांना आणि आपण सर्वांना असे विचारावेसे वाटते की, अशी सदैव हताश पराभवाची पकड मनावर आपण किती दिवस राहू देणार? आज खरी गरज आहे, तीन कोटी मराठी जनतेच्या कल्याणाची. महाराष्ट्राचा सर्वाँगीण विकास साधावयाचा आहे. ही गोष्ट एकटी दुकटी व्यक्ती करू शकणार नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचे दहा-पाच सहकारी यांच्या हातून हे काम होणारे नाही. तीन कोटी जनतेचे हात या कार्याला लागले पाहिजेत. येथे कमी पडले, तेथे तो तुकडा गेला, अशा विफलतेच्या मानसिक अवस्थेच्या आहारी आपण जाता कामा नये. जनतेला त्या वैफल्याच्या अंधःकारात लोटण्याचे काम कोणी करू नये, अशी माझी त्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे. महाराष्ट्र सर्वांगीणरित्या समर्थ बनला तरच आपण आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यास समर्थ होऊ. हे काम एकाचे नाही, ते सर्वांचे आहे. सर्व पक्ष, पंथ, लोकांचे ते काम आहे. महाराष्ट्र निर्मितीकडे मी पक्षाभिनिवेशाने पहात नाही. याबाबतीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कार्याचेहि मी मूल्यमापन करतो. गेल्या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्र निर्मितीची भावना जनतेमध्ये जागृत ठेवण्याचे काम समितीने केलेले आहे. ही त्यंच्या जमाखर्चाच्या पानावरची जमेची बाजू आहे. मी ती आनंदाने मान्य करीत आहे. पण राज्य मिळविणे आणि चालविणे यांत अंतर आहे. त्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे.”
ग्रामीण शिक्षण व ग्रामीण जीवन याबाबतची आपली भूमिका मांडताना यशवंतराव म्हणतात,
“ग्रामीण जीवन व शहरी जीवन यांच्यातील अंतर कमी करण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे खेड्यातील शेती व अन्य उद्योगधंद्याची गतिमानता वाढविणे.”
कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी अधिका-यांनी जनतेशी कसे वागावे, याबाबत यशवंतराव म्हणतात,
“मला न्याय मिळेल असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची व सरकारी अधिका-यांची आहे. अधिका-यांचे चुकले आहे किंवा आपल्याला न्याय मिळत नाही हे निर्भिडपणे अधिका-यांना येऊन सांगण्याचे धैर्य लोकांच्या ठिकाणी असले पाहिजे आणि हा धीर आणि विश्वास जनतेमध्ये अधिका-यांनी निर्माण केला पाहिजे.”
पोलीस दलाचे जनतेशी नाते कशाप्रकारे असावे याबाबत पोलीस अधिका-यांना मार्गदर्श करताना यशवंतराव सांगतात,