• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

लोकनेते यशवंतराव चव्हाण - २३

बंधु गणपतरावांच्या प्रकृतीत सारखा चढउतार होत होता. १९४५ च्या अखेरीस त्यांची प्रकृती खूपच खालावली. यशवंतराव बंधुंच्या सेवेसाठी मिरजेतील दवाखान्यात होते. यावेली प्रांतिक विधी मंडळासाठी निवडणूका येऊ घातल्या होत्या. काही कार्यकर्ते दवाखान्यात येऊन त्यांनी यशवंतरावांना निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. बंधू आजारी असताना त्यांना सोडून निवडणूक लढविले यशवंतरावांना पटले नाही. अखेरीस बंधू गणपतरावांनीच सांगितले, "माझ्या आजारासाठी तू जर ही निवडणूक लढवणार नसलास, तर या दवाखान्यात मी क्षणभरही राहणार नाही. दुराग्रह सोडून निवडणुकीला तयार रहा."

अखेरीस बंधू गणपतरावांच्या आग्रहास्तव यशवंतरावांनी निवडणूक लढविली. त्यांच्यासह सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे चारही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले. निवडणूक प्रचारात बंधू गणपतराव आपला आजार विसरुन सहभागी झाले. मिरजेहून त्यांनी आपला मुक्काम कराडला हालविला. प्रत्यक्ष मतमोजणीला यशवतरावांचे प्रतिनिधी म्हणून स्वत: गणपतराव साता-याला गेले. निवडणुकीच्या राजकारणात यशवंतरावांचा प्रवेश केवळ बंदू गणपतरावांच्यामुळेच झाला. यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यातील पुढल्या ४० वर्षात एकंदर दहा निवडणुका लढविल्या. या सर्व निवडणुकीत ते विजयी झाले. राजकारणात ते सर्वोच्च स्थानावर जाऊन पोहचले. या दैदिप्यमान वाटचालीचा प्रारंभ मात्र आपल्या बंधुमुळेच झाल्याचे यशवंतराव आर्वजून सांगतात.

मार्च, १९४६ च्या निवडणुकीनंतर काँग्रेस पार्लमेंटरी पार्टींची सभा मुंबईत झाली. के. डी. पाटील, श्री. गौरीसिंह सिंहासने व यशवंतराव एका खाजगी मोटारीने मुंबईला गेले. तेथील माधवाश्रम येथे त्यांचा मुक्काम होता. पक्षाच्या सभेत बाळासाहेब खेर यांची पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली. बाळासाहेब खेर मुख्यमंत्री बनले. यानंतर मंत्रिमंडळ बनविण्याची चर्चा सुरु झाली. यशवंतरावांना मंत्रिमंडळात जाण्यात विशेष रस नव्हता. त्यांच्या काही विधीमंडळ सदस्यांनी यशवंतरावांना आग्रह केला. बाळासाहेब खेर , मोरारजीभाई देसाईंना आपण मंत्रिमंडळात घेण्यासंदर्भात भेटून आग्रह करावा असे सुचविले. यशवंतराव आपल्या सहका-यांना म्हणाले,
"मला मंत्रिमंडळात जाण्याची मुळीच इच्छा नाही. शिवाय आपलं काम आणि आपलं नाव पुढा-यांना माहित पाहिजे. नाहीतर ते कसले पुढारी."

एके दिवशी आमदार बाबासाहेब शिंदे व वकील व्यवसाय करणारे माधवराव देशपांडे 'माधवाश्रम' येथे येऊन यशवंतरावांना घेऊन गेले. कुठे जायचे आहे याची कल्पना त्यांनी यशवंतरावांना दिली नाही. मोटारीने बराच वेळ प्रवास केल्यानंतर त्यांना सांगण्यात आले, "बाळासाहेब खेरांनी तुम्हाला बोलवले आहे."

काही वेळानंतर बाळासाहेब खेर यांच्या बंगल्यापाशी गाडी थांबली.

बंगल्यात प्रवेश करताच बाळासाहेब पुढे आले व त्यांनी हसून सर्वांचे स्वागत केले. बाळासाहेब खेर यशवंतरावांना म्हणाले,

"मी तुम्हाला मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही. पण पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून मी तुमची निवड करत आहे."

यशवंतरावांना पार्लमेंटरी सेक्रेटरीपदात विशेष रस नव्हता. ते म्हणाले, "मी घरी जाऊन येतो. मी काही तातडीने हजर होणार नाही."

बाळासाहेबांचा निरोप घेऊन ते तिघे बाहेर पडले. आमदार बाबासाहेब शिंदे गाडीत बसल्यावर यशवंतरावांना म्हणाले,

"यशवंतराव, चूक कराल हं ! नाही म्हणू नका. "