• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

लोकनेते यशवंतराव चव्हाण - २

प्रस्तावना

ना. यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी वर्षात हे चरित्र लिहिल्याबद्दल लेखकाचे प्रथम अभिनंदन ! शिवराम परांजपेंचे निबंध, महात्मा फुलेंचे चरित्र आणि संघर्षमय जीवन यांचा प्रभाव यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर होता. शालेय जीवनातही ते उत्तम वक्ते म्हणून गाजले. जीवनाकडे पहाण्याची व्यापक दृष्टी त्यांना सखोल चिंतनातून प्राप्त झाली.
क्रांतीकारकांच्या बलिदानाने ते पेटून उठले. त्यांनी निर्धार केला की, स्वातंत्र्यासाठी आपले सारे जीवन अर्पण करायचा. अवघ्या २० व्या वर्षी पहिला तुरुंगवास भोगला.
सुसंस्कारीत वेणुताईंनी यशवंतरावांचा हात धरुन संसाराला सुरुवात केली. पण यशवंतरावांचा एक पाय घरात नि दुसरा तुरुंगात. थोरले बंधूही स्वर्गवासी झाल्याने यशवंतराव पोरके बनले. कोल्हापूरात राजाराम कॉलेजमध्ये प्राचार्य बाळकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले. प्रजापरिषदेचे कार्यकर्ते व अनेक साहित्यिकांशी त्यांचा संपर्क आला. हिराबाई बडोदेकरांचे गायन असो वा ना. सि. फडके, माधव ज्युलियन  यांचे साहित्य, काव्य या सा-यात ते रममाण होत. कोल्हापूरच्या या भूमीतच यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वातील वैचारिक परिपक्वता संपन्न झाली. त्यामुळे या भूमीतील एक शिक्षक, लेखक अनिल चव्हाण यांनी त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा ही अतिश आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे.

दिल्लीला रेसकोर्सवरील यशवंतरावांच्या बंगल्यात श्रीदत्ताबाळ यांच्या बरोबर मी सकाळी चहाला गेलो होतो. प्राचार्य एम. आर. देसाई या आपल्या मित्राचा दत्ताबाळ हा मुलगा भेटावयास आला म्हणून त्यांना खूप आनंद झाला. या वेळच्या चर्चेत यशवंतरावांच्यावर असणारा मानवेंद्रनाथ रॉय यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला.  एखाद्याचे म्हणणे शांतपणे कसे ऐकून घ्यायचे हे शिकावे ते यशवंतरावांच्याकडूनच पुन्हा काही वर्षे गेली. दै. लोकसत्तेचा मी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. साहेबांचा फोन आला 'भेटायला येता का?' मी त्यांना भेटायला गेलो. रत्नागिरीतून ते काही वेळासाठी कोल्हापूरात आले होते. भेटीत त्यांनी सांगितले, कोल्हापूरचे व माझे ऋणानुबंध तुम्ही जाणताच. मी दिल्लीत असलो तरी तुमची लोकसत्तेतील 'कोल्हापूरच्या ज्वलंत समस्या' हे लेखमाला नियमित वाचतो. यानंतर कोल्हापूरातील बाहुबलीच्या प्रश्नी मी 'धर्मक्षेत्राची कुरुक्षेत्रे का करता' या शीर्षकाखाली लोकसत्तेत लिहिलेल्या लेखांचा उल्लेख त्यांनी केला व त्यावर आपले मत व्यक्त केले. पण जाता जाता आपली भेट 'ऑफ दि रेकॉर्ड ठेवा ' अशी सूचनाही द्यायला ते विसरले नाहीत.

यशवंतरावांचा वाढदिवस १२ मार्च रोजी तर महाराष्ट्राचे पोलादी पुरुष बाळासाहेब देसाईंचा १० मार्चला. दुर्दैवाने या दोघात निर्माण झालेली संघर्षाची दरी शेवटपर्यंत मिटली नाही याची मला खंत वाटते. हे दोन्ही नेते एकत्र राहिले असते तर महाराष्ट्राचे चित्र पालटले असते. दिल्ली दरबारातही यशवंतरावांना अखेरच्या काळात अवहेलनाच सहन करावी लागली.

यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी अनिल चव्हाण यांनी छोटेखानी पण माहितीपूर्ण चरित्र लिहून एका मराठी सरसेनापतीला आदरांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या थोर कार्याचा परिचय नव्या पिढीला करुन देण्याची गरजच होती. ती या पुस्तकाने अल्पांशाने का होईना पूर्ण झाली आहे. संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी उच्चपदे नेहरु घराण्याने मराठी माणसावर सोपवलेली होती व आहेत हे महाराष्ट्राला विसरता येणार नाही  'कृष्णकाठ' हे त्यांचे बोलके आत्मचरित्र, तर शरद पवार त्यांचे राजकीय वारसदार.

आचार्य अत्रेंच्या 'मराठा' त आणि नरुभाऊ लिमयेंच्या 'गतीमान' मध्ये मी लिहित होतो. या दोघांच्याकडून व अच्युतराव पटवर्धनांकडून यशवंतराव चव्हाणांच्या कार्य कर्तृत्वाचा आदर व्यक्त होताना मी ऐकला आहे. अशा या सह्याद्रिसारख्या कणखर व्यक्तिमत्त्वाची ही चरित्रगाथा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात कार्य करणा-यांना प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही. अनिल चव्हाण यांनी महात्मा फुले, यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे अनेक पुरोगामी चरित्रग्रंथ यापुढेही लिहावेत हीच त्यांच्याकडून अपेक्षा !

- डॉ. सुभाष के. देसाई