मोरारजींनंतर यशवंतराव मुख्यमंत्री झाले. हे राज्य मराठा असणार नाही, मराठी असेल अशी त्यांनी सुरुवातीलाच घोषणा केली. ते सातारा मतदार संघातून निवडून आलेले होते. अर्थात त्यांचा प्रथमचा काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा होता. त्यांच्या कारकिर्दीतील ठळक गोष्ट म्हणजे कोयना धरणाची बांधणी व साखर कारखान्यांना त्यांनी दिलेले उत्तेजन. सैनिकी शिक्षणाकरता त्यांनी साता-यास सैनिकी शाळा काढली. अर्थात यशवंतराव हे महाराष्ट्राच्या जडणघडणीचे अध्वर्यु होते.
दादासाहेब कन्नमवारांची मुख्यमंत्री कारकीर्द अत्यंत अल्पकाळ होती. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात शेतक-याच्या मालकीची सहकारी सूत गिरणी सुरू केली आणि विदर्भातील शेतक-यांना कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून एकाधिकार कापूस योजना सुरू केली.
कन्नमवारांच्या अकस्मात मृत्युमुळे वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. ते जवळजवळ बारा वर्षें मुख्यमंत्री होते. यवतमाळ जिल्ह्याची दळणवळणाच्या दृष्टीने फारशी प्रगती झालेली नव्हती. त्यावेळी नाईकांनी रस्ते तयार करण्याच्या योजना आखल्या. पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथे व पुसद तालुक्यातील पुसद धरण बांधण्यास साहाय्य केले. तसेच १९५७ साली त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्युतीकरण झाले. त्यांनी बंजारा समाजाला शिक्षण घेण्यास व शेती करण्यास उत्तेजन दिले. त्यांना दारूपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या स्त्रियांच्या पोषाखात बदल घडवून आणला. तांडा तेथे शिक्षण ही नाईकांची घोषणा होती. त्यांनी आपल्या समाजाकरता आश्रमशाळा सुरू केल्या. जिनिंग, प्रोससिंग, हे कारखाने काढण्यास उत्तेजन दिले. पुसद भागात द्राक्षाच्या उत्पादनाला गती दिली. हाताला काम आणि शेतीला पाणी हे सूत्र लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. जनता शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले. ह्या संस्थेची आज सहा महाविद्यालये पुसद येथे आहेत. त्यात कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान, औषधी निर्माण, अभियांत्रिकी, शारीरिक शिक्षण, तंत्रशिक्षण अशा विद्याशाखांचा समावेश होतो. त्यांनी येथील ग्रामीण भागात विद्यालये व वसतिगृहे स्थापन करण्यास उत्तेजन दिले.
शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री होते. ते मराठवाड्यातील पहिले मुख्यमंत्री. त्यांनी जायकवाडी व विष्णुपुरी हे उपसा जलसिंचन प्रकल्प पूर्ण केले. विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण करून त्यांनी नांदेड शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. सर्व प्रदेशांचा विकास समतोल व्हावा हीच शंकररावांची भूमिका होती. ते वैधानिक विकास मंडळांच्या स्थापनेच्या विरुध्द होते. प्रकल्प बांधून कोरडवाहू जमिनीला पाणीपुरवठा करण्यास उत्तेजन दिले. येलदरी बांधून नांदेड शहराच्या विजेचा प्रश्न सोडवला. परभणी येथे कृषी विद्यापीठ स्थापण्यात पुढाकार घेतला. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाकरता मराठवाडा ग्रामीण विकास बॅंक स्थापन करण्यात पुढाकार घेतला. मराठवाड्यात नवोदय विद्यालय स्थापण्यात पुढाकार घेतला. त्यांनी नांदेड येथे शारदाभवन शिक्षण संस्था व धर्माबाद शिक्षण संस्था स्थापन केल्या. पुणे येथे मराठवाडा मित्रमंडळ स्थापून त्या ठिकाणी वसतिगृहाची व्यवस्था केली.