विलासरावांचे व्यक्तिमत्व
विलासरावांचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. घराण्याचा खानदानीपणा त्यांच्या डौलदार वागण्यातून दिसून येतो. त्यांना चांगले काम करण्याची उत्कटता आहे. शासकीय कारभारातील अनुभवामुळे राज्याच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. त्यांना माणसाची पारख आहे. निर्णयशक्ती आहे. महाराष्ट्रापुढचे प्रश्नच गंभीर व कठीण आहेत. त्यातून राजकीय हेवेदावे व पक्षीय राजकारणाने महाराष्ट्राला ग्रासले आहे. अशा परिस्थितीत टिकून राहणे ही तारेवरची कसरत आहे. जागा टिकवण्याकरता जाणारा वेळ आणि शक्तीचा –हास ह्यामुळे भरीव कार्य करणे कठीण आहे. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वयंभू नाहीत, त्यांचे अस्तित्व श्रेष्ठींच्या मर्जीवर व पक्षीय राजकारणाच्या वा-यावर अवलंबून असते.
राजकीय डावपेचात देशमुख कितपत यशस्वी होतात, पक्षावर ते कितपत पकड मिळवतात, प्रवाही जनहिताच्या कार्यक्रमाच्या जोरावर ते जनप्रवाह कितपत आपल्याकडे कसा फिरवतात ह्यावरच त्यांचे राजकारणातील स्थान व भवितव्य अवलंबून आहे. त्यांच्या जमेची एक बाजू म्हणजे राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या सौहार्दामुळे व प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे त्यांचा लोकसंग्रह प्रचंड आहे. लोकांच्या प्रश्नांची जाण आणि शांत स्वभाव ह्यांमुळे ते नेहमीच प्रकाशात राहतील.
राजू परुळेकर म्हणतात- आमदारांनी त्यांना नेता म्हणून पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आणले ते त्यांच्या स्वभावातील सुरक्षितता, विश्वासार्हता, दिलदारपणा आणि त्यांचा उमदा दृष्टिकोन पाहूनच. जनसमर्थन आणि पक्षातल्या बहुसंख्य आमदारांचे समर्थनही त्यांनालाभलेले आहे. अर्थात राजकारण हा बिनभरवशाचा खेळ आहे. राजकीय मुत्सद्देगिरी आणि चातुर्य यांबरोबरच सत्ता टिकवण्याकरता नशिबाचाही आधार लागतो हे त्रिवार सत्य आहे. सुदैवाने इंडिया टुडेने नुकताच मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांना तिसरा क्रमांक दिला असून त्यांच्या कार्याला दिलेली ही पावतीच आहे.
संदर्भग्रंथः
१) सोपान गाढे- श्री. विलासराव देशमुख, जानेवारी २००२, अविष्कार प्रकाशन, पुणे.
२) राजू परुळेकर – मला भेटलेली माणसे, ऑक्टोबर २००६, नवचैतन्य प्रकाशन, बोरिवली.
३) म.टा. – महाराष्ट्राच्या आर्थिक अधोगतीची मीमांसा, २१ नोव्हें. २००५, पान ७.
४) टाईम्स ऑफ इंडिया – १०-२-२००६
५) इंडिया टुडे – १२-२-२००७
*टीकेचा उल्लेख मी विलासरावांच्या बाबतीतच केली याचे कारण आज राज्यशकट त्यांच्या हातात आहे आणि लोकांची नजर दुर्बिणीतून त्यांच्याकडे आहे! - डॉ.रायरीकर