वसंतराव नाईकांचे व्यक्तिमत्व
वसंतरावांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे रहस्य कशात आहे असा प्रश्न निर्माण होतो. नाईकांना छानछोकी पध्दतीने राहण्याचे बाळकडू होते. त्याचबरोबर ते उत्तम शिकारी होते. कोणाची मर्जी सांभाळून अधिकारपद मिळवता येईल व टिकवता येईल हे त्यांना शिकारी म्हणून पूर्ण माहिती होते, हे एक त्यांच्या दीर्घ कारकिर्दीचे रहस्य आहे. त्याचबरोबर श्री. धुळप यांनी म्हटल्याप्रमाणे ते प्रकांडपंडित नव्हते, संघटनेचे अध्वर्यू नव्हते, राजकारणधुरंधर नव्हते, पट्टीचे वक्तेही नव्हते. त्यांच्या यशाचे मर्म त्यांचे लोभस व्यक्तिमत्व, वागणुकीतील गोडवा,बोलण्यातली खानदानी ऋजुता ह्यांत आहे. शांतपणे काम करणे, मितभाषीपणा, विरोधकांबद्दल आदर, सभ्य व विनयशील व्यक्तिमत्व आणि सर्व प्रश्नांचा सखोल अभ्यास करण्याची सवय या त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या महत्वाच्या पैलूंनी त्यांच्या यशात भर घातली. त्यांच्या यशाचे तिसरे कारण म्हणजे त्यांचा दांडगा लोकसंग्रह व तो टिकविण्याचे कौशल्य. कोणत्याही परिस्थितीत राजकारणातील आदळाआपटीने विचलित न होता त्याला शांतपणे तोंड देण्याचे त्यांचे कसब कौतुक करण्यासारखेच होते. उमदे, सुशिक्षित, संपन्न, संयमी, कसदार, दर्जेदार व विलोभनीय व्यक्तिमत्व असलेले सभ्य गृहस्थ असे त्यांचे वर्णन केले जात असे. आशावादी, आनंदी, मानवतावादी दृष्टिकोन व मोकळा स्वभाव ही त्यांची वैशिष्ट्ये म्हटली जात असत. शेतीवर त्यांचे प्रेम होते. म्हणून त्यांच्या स्मृतिदर्शक मुंबई येथे वसंतराव नाईक कृषि संशोधन आणि विकास प्रतिष्ठान ही संस्था स्थापिली आहे. त्या संस्थेतर्फे दरवर्षी शेती शेतकरी व शेती उद्योग यांतील शेतक-यांचा १ जुलैला सत्कार करतात.
संदर्भग्रंथः
१. आवाहन – वसंतराव नाईक ह्यांच्या भाषणांचा संग्रह १९७१, प्रकाशक डी. एन. देसाई
२. बैस रासबिहारी सिंग व देशपांडे दिनकर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव
३. देसाई दिनेश – द प्लव अन्ड द पाईप १९९३, प्रकाशक डी. एन. देसाई, दादर ४०० ०२८.
नित्सुरे म.गो. (संपादक)
४. प्रकाशक डॉ. एन. एन. कैलास – श्री. व्ही. पी. नाईक गौरवग्रंथ
५. पठाण यू. म. (संपादक) – वसंतराव नाईक षष्ट्यब्दीपूर्ती निमित्ताने – हिरवी
क्षितिजे – १९७३
६. माहिती व जनसंपर्क संचालनालय – महाराष्ट्र शासन – समृध्दीच्या वाटा – मुख्यमंत्री
वसंतराव नाईक ह्यांच्या निवडक भाषणांचा संग्रह, जानेवारी १९७६
७. रुद्रवार उत्तम – महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक, जुलै २००४, महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळ