• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

आमचे मुख्यमंत्री -२७

श्री. कुमार केतकरांनी यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचे खालील शब्दांत विश्लेषण केले आहे. (श्री. साखळकर – डॉ. भेंडे – महाराष्ट्राची मानचिन्हे पृष्ठ २६१). ते म्हणतात, की मानचिन्हे या शब्दानेच राष्ट्रीय जीवनातील त्यांची उंची स्पष्ट होते. त्यांच्या वास्तववादात आदर्शवाद होता. अर्थात त्यांचे टीकाकर त्या वास्तववादाला व्यवहारवाद वा संधिसाधूपणा समजतात. केतकर म्हणतात की त्यांच्या राजकारणात एक विलक्षण रसायन होते. त्यात सामाजिक चळवळीचा वारसा, अध्ययनाची जोड, नेहरूवाद, गांधी तत्वज्ञान, फुले-आंबेडकरांच्या बंडखोरीची झाक, रॉयवाद ह्यांचे सुरेख मिश्रण होते आणि म्हणून वैचारिक देवाणघेवाण व सामाजिकपणा ह्यावर त्यांचा विश्वास होता.

त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या सर्वंकष विस्ताराचे वर्णन वर केलेलेच आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपद, संरक्षण, अर्थमंत्री, परराष्ट्रीय मंत्रिपद ही सर्व पदे भूषविली. ते भारताचे उपपंतप्रधानही झाले. परंतु त्यांच्या द्विधावृत्तीमुळे प्रधानमंत्री होण्याची संधी असतानाही ते पद त्यांच्या हातून सुटले. श्री. पाटील ह्यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्यांचे नेतृत्व संपूर्ण राज्याचा विचार करणारे होते.

श्री. विठ्ठलराव पाटील म्हणतात की ते महाराष्ट्राचे शिल्पकार होते. त्याबरोबर चतुर राजकारणी, कर्तव्यदक्ष प्रशासक, रसिक साहित्यिक, ज्ञानपिपासू व चारित्र्यसंपन्न नेता असे अत्यंत उच्च श्रेणीचे ते एक मानव होते.

अर्थात एक गोष्ट मान्य करावयास पाहिजेच की त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला एक दिशा दिली. त्या विकासाचा आशय ठरविला. परंतु त्यांनी त्यांच्या विचारांची ध्वजा पुढे तितक्याच जागृततेने नेणारे नेतृत्व निर्माण केले नाही. सत्तेवर दृढपणे टिकून राहणे हा सर्व पुढा-यांचा स्थायीभाव होता. कदाचित त्यामुळे प्रभावी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. हीच यशवंतरावांची व महाराष्ट्राची शोकांतिका. कारण ह्या संधिसाधू राजकारणातच महाराष्ट्रातील सध्याच्या भ्रष्ट राजकारणाची पाळेमुळे शोधली पाहिजेत.

महाराष्ट्राच्या विकासाबद्दल यशवंतरावांची भूमिका किती विशाल, पुरोगामी आणि न्याय्य होती याची साक्ष यशवंतरावांनी दिलेल्या एका भाषणात मिळते. या भाषणात ते म्हणतात, महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही जे करणार आहोत त्याची दिशा अगदी स्पष्ट आहे. राष्ट्रीय ऐक्यास पोषक होईल अशा त-हेनेच आपल्याला महाराष्ट्र राज्यातील सर्व वर्गांचा विकास व उन्नती घडवून आणायची आहे. सामाजिक एकात्मतेच्या बाबतीत आपले काही खास प्रश्न असून ते सोडविण्यासाठी आपण योग्य ते उपाय शोधून काढले पाहिजेत. नव्या राज्यामधले काही प्रदेश आर्थिकदृष्ट्या अविकसित व मागासलेले आहेत. स्वाभाविकपणे त्यांचा विकास ही महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने खास विचाराची बाब आहे..... समान संधी ही सामाजिक न्यायाच्या कल्पनेतील महत्वाची बाब आहे. म्हणून बुध्दी असूनही केवळ पैशांच्या अभावी तिला वाव मिळत नाही असे होता कामा नये. महाराष्ट्रात अशा प्रकारे सर्वांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळेल अशी परिस्थिती निर्माण करण्याकरता आपण झटले पाहिजे.