२६
‘मराठा’ हा शब्द जातीवाचक नाही. आचार्य अत्र्यांनी आपल्या वर्तमानपत्राला ‘मराठा’ हे नाव दिले ते काय तो शब्द जातीवाचक आहे म्हणून दिले? ‘मराठा’ शब्दामागे महाराष्ट्राच्या एकजिनसी जीवनाची भावना आहे. ‘ मराठा’ शब्दाचा हाच अर्थ आम्हाला अभिप्रेत आहे आणि म्हणून मराठी राज्य हे कोणा एका जमातीचे राज्य मुळीच होता कामा नये, या गोष्टीवर माझा जरूर विश्वास आहे.
२७(अ)
पंढरीच्या वारक-याला जागा करून चंद्रभागेच्या वाळवंटावर जातभेद काही नाही असेच जणू घोषित करीत भागवत धर्माचा झेंडा उभा राहिला. माझ्या कल्पनेत तो सुधारणेचा झेंडा होता. आजही मी पंढरपूरच्या मंदिरात जातो तेव्हा याच भावनेने जातो. चंद्रभागेच्या वाळवंटावर महाराष्ट्रातल्या खेडयापाडयातला ब्राम्हण, मराठा, माळी, न्हावी, भंगी, कुंभार, सुतार, महार- मी हे वेगवेगळे जातीवाचक शब्द वापरतो; त्यांचा उल्लेख केला पाहिजे म्हणून वापरतो; मला त्याची काही हौस नाही-हे सगळे तेथे एका मेळाव्यामध्ये आले आणि त्यांनी पंढरीचा झेंडा, भागवत धर्माचा झेंडा उभा केला. त्यामध्ये जसे तुकाराम झाले, नामदेव झाले, रामदास झाले, ज्ञानेश्वर झाले, तसेच चोखामेळा, गोरा कुंभार आणि सावता माळी हेही झाले. खरे म्हणजे सामाजिक क्रांतीच व्हावयास पाहिजे होती अशा वेळी.
२७(ब)
पण आजही आम्ही असे पाहतो; की सावता माळी फक्त माळयांचा संत आहे, नामदेव फक्त शिंप्यांचा संत आहे, चोखा मेळा फक्त महारांचा संत आहे, गोरा कुंभार फक्त कुंभारांचा संत आहे. अशीच वाटणी का आम्ही नेहमी करणार आहोत? शिंपी समाजाला नाव देताना नामदेव शिंपी समाज असे म्हणतात. नामदेवांचे एवढे मोठे विश्वव्यापी काम! परंतु आज आम्ही काय त्यांना एका शिंपी समाजाचे प्रतीक मानणार? मी शिंपी समाजाला दोष देत नाही, पण आमची प्रवृत्ती कशी आहे पहा! जोतिबा फुल्यांनी सामाजिक क्रांतीचा संदेश दिला. त्या संदेशातून डॉ. आंबेडकर यांच्यासारखी कर्तृत्ववान, धगधगती माणसे निर्माण झाली. एक मोठी शक्ती निर्माण झाली. पण महात्मा फुले फक्त माळयांचे, डॉ.आंबेडकर फक्त बौध्दांचे, गांधी फक्त गुजराथ्यांचे, टिळक फक्त ब्राम्हणांचे, शिवाजी महाराज फक्त मराठयांचे अशा प्रकारे जर आम्ही या महापुरूषांच्या वाचण्या केल्या, तर हिंदुस्थानमध्ये सामाजिक क्रांती कधीच होणार नाही.
२८
आपण ज्ञानीही व्हा व शहाणेही व्हा. ज्ञानात आणि शहाणपणात फरक आहे असे सुचविलेले आहे. शास्त्रांचे ज्ञान तत्त्वाच्या दृष्टीने करून घेणे अत्यंत आवश्यक असते; परंतु त्या ज्ञानाचा समाजजीवनात उपयोग करून घेण्याचे जे शास्त्र आहे त्याचे नाव शहणपण असे मी समजतो. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर ज्ञानाबरोबरच हे शहाणपण मिळवावे लागणार आहे; कारण या शहाणपणाची देशाला आज फार गरज आहे.