हिमालयाचे पहिले दर्शन !
सन १९३१ सालची गोष्ट. यशवंता तेव्हा कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकत होता. परंतु स्वत:च्या शिक्षणापेक्षा स्वातंत्र्याच्या चळवळीकडेच त्याचे जास्त लक्ष होते. वर्तमानपत्रातील बातम्या वाचून देशातील बदलत्या वातावरणाची त्याला कल्पना येत होती. आपल्या सवंगड्यांना तो या घटनांचा अन्वयार्थ समजाऊन सांगायचा. यशवंताचे विश्लेषण ब-याचदा अचूक असायचे. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली व पं. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या लढाईत सामील होण्याचा निर्णय त्या सर्व बालवीरांनी घेतला होता.
जवाहरलाल नेहरू हे त्या काळातील युवकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. एके दिवशी यशवंताला समजले की, पं. जवाहरलाल नेहरू बंगलोर मेलने हुबळीला जाणार आहेत. आपला प्रिय नेता आपल्या गावावरून पुढे जाणार आहे याचा यशवंताला विशेष आनंद झाला. लाहोर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करणा-या या तडफदार नेत्याचे दर्शन आपण घ्यायचेच असा त्याने निर्धार केला. आपला हा मनोदय त्याने मित्रांना सांगितला. त्यांनाही आनंद झाला, पण काहीजण म्हणाले, ' बंगलोर मेल कराड स्टेशनवर रात्री बारा नंतर येते. पंडितजी तेव्हा झोपलेले असणार. अशावेळी त्यांची झोपमोड करून त्यांना कोण उठवणार ?'
' त्याची काळजी करू नका. नेहरू आपल्याला नक्की भेटतील.' यशवंता आत्मविश्वासाने म्हणाला. काही झाले तरी नेहरूंना उठवून विद्यार्थ्यांसमोर उभे करायचेच असे यशवंताने मनोमन ठरवले. ठरल्याप्रमाणे चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांचा तांडा रात्री कराड स्टेशनकडे निघाला. सगळेजण बंगलोर मेलची वाट पहात होते. गाडीची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचली. अखेर तो क्षण आला. बंगलोर मेल कराड स्टेशनवर येऊन उभी राहिली. यशवंताने व त्याच्या सहका-यांनी पंडितजींचा डबा शोधून काढला. डब्याभोवती सर्वजण उभे राहिले. धडधडत्या अंत:करणाने यशवंताने डब्याचे दार वाजवले. जवाहरलाल जागे झाले व दार उघडून बाहेर आले. झोपमोड झाल्याने काहीशा रागीट मुद्रेनेच त्यांनी मुलांकडे पाहिले, पण आपल्याला भेटण्यासाठी इतकी सगळी लहान मुले रात्रभर फलाटावर ताटकळत उभी राहिली होती हे कळाल्यानंतर त्यांचा राग क्षणार्धात मावळला. त्यांनी मुलांचे आभार मानले. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. गाडी सुटण्याची वेळ होईपर्यंत नेहरू त्या बाळगोपाळांच्या मेळाव्यात रमले. दहा मिनिटांनी गाडी सुटली. ' जयहिंद ' म्हणून नेहरूंनी सर्वांचा निरोप घेतला. यशवंता हात हलवून त्यांना निरोप देत होता. त्याला कुठे माहित होते की आता हाल हलवून त्याचा निरोप घेणारे जवाहरलाल पुढे एकतीस वर्षांनी त्याला हाक देऊन दिल्लीला बोलावून घेणार आहेत ते ?
घडणा-या प्रत्येक घटनेमागे नियतीचा हात असतो हे खरे, पण प्रत्येकवेळी तो दिसतोच असे नाही. ते काही असो, आपल्या आवडत्या नेत्याच्या पहिल्या दर्शनाने यशवंताला अपूर्व आनंद झाला. आपणही नेहरूंप्रमाणे थोर राजकारणी बनायचे अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली.