गाडी पळसखेडला वळवा !
केंद्रीय मंत्री असताना यशवंतराव एकदा मराठवाड्याच्या दौ-यावर आले होते. गाडीतून प्रवास करीत असताना ' रानातल्या कविता ' हे एका नवोदित कवीच्या रानकवितांचे पुस्तक त्यांच्या हातात आले. सहज म्हणून सुरूवातीच्या चार - पाच कविता त्यांनी वाचल्या आणि त्या अदभूत शब्दकळेने, त्यातील नादमाधुर्याने व अर्थसौंदर्याने ते भारावून गेले. त्यांनी पुन्हा एकदा मुखपृष्ठ पाहिले - कवीचे नाव होते - ' ना. धों. महानोर .' यशवंतराव लगेच ड्रायव्हरला म्हणाले, ' अरे !
गाडी पळसखेडला वळवा.'
ड्रायव्हरला काही कळेना. साहेबांचे तर पळसखेडला भाषण नाही, कार्यक्रम नाही. पण साहेब ,सांगतात म्हणून ड्रायव्हरने गाडी पळसखेडला वळवली आणि यशवंतरावांनी कवी ना. धों. महानोरांना बोलावून आपल्या गाडीतच घेतले. त्यांचे पाठ थोपटून कौतुक केले. त्यांनी लिहिलेल्या रानकविता त्यांच्याकडून वाचून घेतल्या. दुस-या दिवशी सगळ्या मराठी वृत्तपत्रांत ना. धों. महानोरांचे नाव झळकले. आज महानोरांच्या कविता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या आहेत. पण या कवितांचा पहिला महान रसिक म्हणून यशवंतरावांचा उल्लेख करावा लागेल.