• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-देवाघरचे नाते... !

देवाघरचे नाते...  !

यशवंताचे बहुतेक सगळे बालपण त्याच्या आजोळी ; म्हणजे देवराष्ट्रे या छोट्या गावात गेले. मामाच्या घराभोवतीची इतर घरे सणगर, रामोशी, पाटील, मुस्लिम अशा अनेक जातीधर्माच्या लोकांची होती. अशाच एका झोपडीवजा घरात कुलसुम दादी नावाची वृद्धा राहायची. तिचा नातू गुलाब आणि यशवंता हे दोघे एकाच वयाचे होते. यशवंताच्या आजीची आणि कुलसुम दादीची अगदी घट्ट मैत्री होती. सकाळ- संध्याकाळच्या वेळेस काही ना काही मागायला किंवा द्यायला आणि त्या निमित्ताने गप्पाटप्पा करायला. ही कुलसुम दादी हमखास यायची. मग दोघींच्या जिव्हाळ्याच्या गप्पा व्हायच्या. यशवंताही दादीच्या घरी नेहमी जात असे. इतकेच नव्हे तर अधुनमधून तिथेच जेवणही करत असे. यशवंताला खाऊ-पिऊ घालताना कुलसुम दादीला वेगळाच आनंद मिळायचा. हळूहळू त्या दोघांमध्ये आजी-नातवाचा जिव्हाळा निर्माण झाला होता.

पुढे शिक्षणासाठी यशवंता कराडला राहिला, तरी दरवर्षी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत तो न चुकता आजोळी जात असे. आजोळी आल्यावर पहिल्यांदा तो धावत कुलसुम दादीकडे जायचा. दादीला भेटल्यावर त्याला एक वेगळाच आनंद मिळायचा. एकदा अशाच एका वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आजोळी आला होता. वैशाख महिन्यातल्या अमावस्येची ती रात्र होती. सर्वजण अंगणात झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्याने आरडाओरडा सुरू झाला, म्हणून यशवंता दचकून जागा झाला. पाहतो तर त्याला समोर आगीचे लोळ दिसत होते. शेजारच्या वाड्यातल्या कडब्याच्या गंजीला आग लागली होती. स्वसंरक्षणासाठी सगळेजण घरात शिरले. पण यशवंताची वृद्ध आजी कुलसुमच्या काळजीने बेचैन झाली होती. गंजीशेजारीच दादीचे घर होते. आजी म्हणाली, ' अरे , ही आग कुलसुमचं घर खाऊन टाकील. बाहेर जाऊन कुणीतरी पाहा.'

कुलसुमच्या घराला व जिवाला धोका आहे हे लक्षात येताच यशवंता तीरासारखा धावत सुटला. रस्त्यावर शुकशुकाट होता. अधूनमधून दगड पडत होते. यशवंता दादीच्या घराजवळ आला, आता आगीने घराला वेढा घातला होता. दादी शेळ्या सोडून मोकळ्या करण्यासाठी धडपडत होती. यशवंता तिच्याजवळ गेला व ओरडला, ' आमच्या आजीने तुला बोलावलंय... ! '

डोळ्यासमोर जळणारं घर पाहून दादी सुन्न झाली होती. तिचा पाय निघत नव्हता, पण यशवंताने तिला हाताला धरून आजीकडे आणले. दादीचा जीव शेळ्यात अडकला होता. इतक्यात तिचा मुलगाही शेळ्या घेऊन आला. त्या रात्री दादीची झोपडी त्या आगीत नष्ट झाली, पण ती, तिची मुलंबाळं, शेळ्या सगळेजण आजीच्या अंगणात सुरक्षित राहिले.

त्या वर्षीच्या सुटीनंतर बरेच दिवस यशवंताला आजोळी जाणे फारसे झाले नाही. पुढे काही वर्षांनी आजी वारल्याचे कळल्यावर जेव्हा यशवंता देवराष्ट्रेला आला तेव्हा त्याला कुलसुम दादी दिसली नाही आणि तिचे घरही दिसले नाही. ती कुठं गेली हे कुणालाच माहित नव्हतं. कुलसुम दादीच्या न भेटण्यानं यशवंताचं आपली आजी गेल्याचं दु:ख अधिकच वाढलं. रक्ताच्या नात्याइतकीच अशी जोडलेली नाती घट्ट असतात याची त्याला जाणीव झाली. दादीचं आणि आपलं नातं होतं असा प्रश्न यशवंताला पडला आणि त्याच्या मनानं उत्तर दिलं. ' ते देवाघरचं नातं होतं  !'