वा गड्यांनो... अगदी हुबेहूब... !
१९५७ सालची गोष्ट. दहिवडी ( जि. सातारा ) येथील बाजारतळावर यशवंतरावांची प्रचारसभा आयोजित केली होती. यशवंतरावांची वेशभूषा हा एक ब्रॅण्ड बनला होता व महाराष्ट्रातील अनेक नेते त्यांचे अनुकरण करीत असत. दहिवडी शेजारच्या शिंदी भांडवली गावच्या माळावर कैकाड्यांची काही बि-हाडं रहात होती. याशिवाय दरवेशी आणि बहुरूप्यांची सुद्धा काही कुटुंबे तिथे होती. तुकाराम व आत्माराम या दोघा बहुरूप्यांना यशवंतरावांच्या सभेची बातमी कळाली. त्यादिवशी आपण यशवंतरावांचे सोंग करायचे असे दोघांनी ठरवले. पण साहित्य कोठून आणायचे ? तुकारामाने गावच्या पाटलाकडून पांढरं धोतर, टोपी व जाकीट आणलं. एका वृद्ध स्वातंत्र्यसैनिकाकडून चपला आणल्या. आत्मारामने इंग्रज पोलीस शिपायाचे सोंग आणायचे ठरवले होते. त्यानेही शिपायाचा पोशाख कोणाकडून तरी मागून आणला. सभेच्या दिवशी दोघेजण बाजारतळावर गेले. टोपी, जाकिट, धोतर व कोल्हापुरी चपला असा वेश करून तुकाराम सुहास्य मुद्रेने लोकांना हात जोडून नमस्कार करीत होता, तर एक पाय गुडघ्यात बांधलेल्या अवस्थेत खाकी कपडे व कमरेला पट्टा घालून आत्माराम त्याच्याशेजारी उभा होता. दुपारी यशवंतराव आले. भाषण करण्यापूर्वी त्यांना विंचू दंश झाला होता. तरीही ते तास-दीड तास बोलले. सभा संपल्यावर स्टेजवरून खाली उतरून ते गाडीकडे निघाले. विंतूदंशाच्या कळा अंगभर येत होत्या. ते गाडीत बसणार इतक्यात गर्दीत उभा असणा-या ' यशवंतरावांकडे ' ( तुकारामकडे ) त्यांचे लक्ष गेले. आपल्या पोशाखाची केलेली नक्कल बघून यशवंतराव त्यांच्याजवळ गेले व पाठीवर थाप टाकून म्हणाले, ' वा गड्यांनो, अगदी हुबेहूब... ! '
खुद्द यशवंतरावांचा स्पर्श झाला या भावनेने त्या दोघांना आनंदाने रडूच आले. असे होते यशवंतराव ! सामान्यातल्या सामान्य माणसाकडे जातीने लक्ष देणारे.