• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- यशवंतराव, तुम्ही शब्द राखलात !

यशवंतराव, तुम्ही शब्द राखलात  !

ग. त्र्यं. माडखोलकर हे महाराष्ट्रातील विख्यात लेखक व पत्रकार होते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्यांचा चांगला अभ्यास होता. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मराठी मनाला उत्साहाचे उधाण आले. यशवंतराव संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. ' महाराष्ट्राच्या भवितव्याची सफर ' त्यांनी जनतेला सोबत घेऊन सुरू केली. अशा नवीन आशावादाने भारलेल्या काळात माडखोलकरांनी त्यांच्या दैनिकात एक अग्रलेख लिहिला - ' हे मराठी राज्य होणार की मराठा राज्य होणार ?' असे शीर्षक असलेला हा अग्रलेख महाराष्ट्रात फार गाजला. महाराष्ट्रात मराठा समाज संख्येने जास्त असून सत्तेच्या माध्यमातून हा समाज महाराष्ट्रावर वर्चस्व गाजवेल, असा त्यांच्या प्रश्नाचा रोख होता.

माडखोलकरांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला यशवंतरावांनी ५ जानेवारी १९६० रोजी सांगली येथे झालेल्या जाहीर सभेत उत्तर दिले. माडखोलकर विचारवंत व साहित्यिक असून आपले मित्र असल्याचा निर्वाळा देऊन साहेब म्हणाले, ' असे प्रश्न उपस्थित करून संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल, तर मला त्यांना जरूर सांगायचे आहे की, हे मराठा राज्य मुळीच होणार नाही. जोपर्यंत माझ्या हातात सत्तेची सूत्रे असतील तोपर्यंत तरी मी हे राज्य एखाद्या जातीचे होऊ देणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही तसे वचन दिले आहे.'

यशवंतरावांनी दिल्लीला जाईपर्यंत आपला शब्द नेकीने पाळला. त्यानंतरही त्यांनी मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक यांच्या रूपाने तब्बल तेरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मराठेतर समाजाला दिले. माडखोलकरांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला व यशवंतरावांनी दिलेल्या उत्तराला खूप वर्षे उलटून गेल्यावर माडखोलकरांची व यशवंतरावांची एकदा भेट झाली, तेव्हा माडखोलकर म्हणाले, ' यशवंतराव तुम्ही दिलेला शब्द राखलात.' त्यांची ही प्रतिक्रिया यशवंतरावांना खूप सुखावून गेली. त्यांच्या तत्त्वनिष्ठेला मिळालेली ही पावतीच होती. माडखोलकरांचे हे शब्द यशवंतरावांना बळ देत राहिले.