माझी जीवननौका भरकटू लागलीय !
साता-याचे बन्याबापू गोडबोले हे यशवंतरावांचे बालपणापासूनचे मित्र होते. १९६२ पासून यशवंतराव दिल्लीत रहात होते, तर बन्याबापू साता-यात राहूनच समाजकारण करीत राहिले. १ जून १९८३ रोजी वेणूताईंचे निधन झाले आणि यशवंतराव एकटे झाले. राजकीय जीवनात अनेक आघात झेलणारे यशवंतराव या कौटुंबिक आघाताने मात्र घायाळ झाले. यशवंतरावांचे महाराष्ट्रातील अनेक चाहते दिल्लीला जाऊन त्यांचे सांत्वन करून आले.
एकदा मुंबईतील रिव्हेरा या निवासस्थानी यशवंतराव आले असताना, बन्याबापू साहेबांना भेटायला आले. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर एकटेपणा वाट्याला आलेल्या आपल्या मित्राला सांत्वनपर दोन शब्द सांगावेत म्हणून ते गेले होते. वेणूताईंचा विषय निघाला आणि यशवंतरावांचा चेहरा कधी नव्हे इतका शोकाकुल झाला. भावनातिरेकामुळे त्यांना नीट बोलतासुद्धा येईना. स्वत:ला सावरत ते म्हणाले, ' बन्याबापू, माझ्या जीवनातली ही पोकळी मला सर्वांगाने वेढून टाकत आहे. उभ्या आयुष्यात कशाचीच मागणी न करणारी माझी पत्नी मला सोडून गेली....., मी पोरका झालो आहे. आय़ुष्याच्या चढउतारावर तिने माझी फक्त सेवाच केली. सावलीप्रमाणे ती नेहमी माझ्या समवेत राहिली. माझे आयुष्य तिनेच घडविले. तिच्याविना माझी ही जीवननौका भरकटू लागलीय. लवकरच ती काळाच्या भोव-यात सापडणार आणि संपणार.'