जिकडे यशवंतराव तिकडे...
जनता सरकार गडगडल्यानंतर १९८० साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. यशवंतरावांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. पण यावेळची परिस्थिती वेगळी होती. ते काँग्रेसचे उमेदवार नव्हते, तर रेड्डी काँग्रेसचे उमेदवार होते. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने या निवडणुकीत यशवंतरावांच्या विरूद्ध शालिनीताई पाटील यांना उमेदवारी दिली. यशवंतरावांना मानणारे खूप लोक या मतदारसंघात होते, पण त्यांच्या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात नगण्य होता. ज्या काँग्रेस पक्षाला आपण आपले जीवन वाहिले त्या पक्षाविरूद्ध लढण्याची वेळ आपल्यावर आली, याचे यशवंतरावांना मनस्वी दु:ख झाले . पण त्यांचा नाईलाज होता. या निवडणुकी दरम्यान माण तालुक्यातील पत्रकार एस. के. कुलकर्णी लोकांचा कल आजमावत गावोगावी फिरत होते. एका गावात त्यांनी काही शेतक-यांना विचारले , ' यावेळी तुम्ही कोणाला मतदान करणार ?'
कोणाला म्हणजे ? चव्हाण साहेबांनाच !'
' पण यशवंतराव यावेळी काँग्रेसचे उमेदवार नाहीत.'
' पण ते उभे आहेत ना ?'
' होय .'
' मग आमचं मत त्यांनाच.'
' पण पक्षाचे काय ?'
' जिकडे यशवंतराव तिकडे आमचे मत .'
असा होता यशवंतरावांचा करिश्मा ! या करिश्म्यामुळे व जनतेच्या हृदयात स्थान मिळाल्यामुळेच इंदिरा काँग्रेसची लाट आली असूनही त्या निवडणुकीत यशवंतराव विजयी झाले. विशेष म्हणजे रेड्डी काँग्रेसचे ते महाराष्ट्रातील एकमेव विजयी उमेदवार होते.