तू गेल्यावर...
१ जून १९८३ रोजी सौ. वेणूताई यशवंतरावांना सोडून गेल्या आणि साहेबांचे जीवन अंधारमय झाले. त्यांचा ऊर्जास्त्रोत हरवला आणि होकायंत्र नसलेल्या जहाजासारखी त्यांची अवस्था झाली. ते वेणूताईंवर इतके अवलंबून होते, की त्यांच्या जाण्याने त्यांची जगण्याची इच्छा आणि शक्तीसुद्धा हरवली.
वेणूताई गेल्यानंतर यशवंतराव दिल्लीतच रहात होते. काही विश्वासू नोकर हेच त्यांचे सोबती होते. एके दिवशी नोकराने भाजी आणण्यासाठी साहेबांकडे पैसे मागितले. चाळीस वर्षांच्या सहजीवनात वेणूताईंनी घरातील किरकोळ बाजार व इतर कामे करण्याची जबाबदारी आनंदाने पेलली होती. पण आता त्या नव्हत्या. यशवंतराव एकटे होते. मग नोकर दुस-या कोणाला पैसे मागणार ? त्यांनी त्याला दहा रुपये दिले. दहा रुपयांमध्ये पाच माणसांची दोन तीन दिवसांसाठीची मंडई कशी आणायची हे नोकराला कळेना. महागाई वाढली होती, पण मंडई आणण्याबाबत कधीच माहिती नसलेल्या यशवंतरावांना ही बाब माहित नसणे स्वाभाविक होते. त्या नोकराने दबकत दबकत साहेबांना भाज्यांच्या वाढलेल्या दरांविषयी माहिती दिली. मग त्यांनी आणखी दहा रुपये खिशातून काढून त्याच्या हातात दिले. नोकराला आणखी पैसे मागावेसे वाटेनात. शेवटी त्याने त्याच्या जवळचे पंधरा रुपये त्यात घालून पस्तीस रुपयांची मंडई आणली व बील यशवंतरावांना दिले. पण त्यांनी ते बघितले सुद्धा नाही. त्यांना आता कशातच रस उरला नव्हता. त्यानंतर पुन्हा एकदा असेच घडले. नोकर म्हणाला, ' साहेब, भाज्यांचे दर वाढले आहेत. इतक्या कमी पैशात मंडई कशी आणणार ?'
साहेब म्हणाले, ' अरे, मग अगोदरच सांगायचेस ना ?'
बिचारा नोकर गप्पच बसला. त्याला माहित होते, यशवंतरावांना काही समजावून सांगण्याची क्षमता जशी वेणूताईंकडे होती तशी आपल्याकडे नाही.