• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- स्थितप्रज्ञ यशवंतराव

स्थितप्रज्ञ यशवंतराव

सन १९५७ सालच्या विधानसभेची निवडणूक सुरू होती. दहिवडी ( जि. सातारा ) येथे यशवंतरावांची प्रचारसभा होती. दुपारी एकच्या सुमारास यशवंतरावांचे दहिवडी गावात आगमन झाले. त्यांच्याबरोबर श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, आमदार भिंगारदेवे, इत्यादी नेते होते. गावक-यांनी उघड्या , सजवलेल्या जीपमधून यशवंतरावांची मिरवणूक काढली. गावभर फिरून शेवटी मिरवणूक सभास्थळी आली. यशवंतराव , मालोजीराजे व इतर नेते स्टेजवर जाऊन बसले. स्वागत व सत्कार सुरू झाले. इतक्यात स्टेजवर बसलेले सगळे नेते अचानक उठले. स्टेजवरील गाद्या उचकटल्या गेल्या. हा गोंधळ पाहून समोरचे सगळे लोकही उठले. ' काय झालं ? काय झालं ?' असे जो तो इतरांना विचारू लागला. माईकवरून एक कार्यकर्ता लोकांना खाली बसण्याचे आवाहन करीत होता. कुणीतरी म्हणालं, ' यस्वंतरावास्नी ईच्चू चावला. ' हळूहळू गोंधळ कमी झाला. मांत्रिक आणि वैद्य स्टेजकडे धावले. यशवंतराव शांतपणे उठले. त्यांनी सारे उपचार नाकारले. माईक हातात घेतला. तेवढ्यात एका माणसाने पानाचा विडा दिला. तो तोंडात टाकून काही घडलेच नाही अशा थाटात यशवंतरावांनी बोलायला सुरुवात केली. खळ्या, कोपरखळ्या व टाळ्यांनी सभा रंगली. भाषण संपल्यावर यशवंतराव खाली आले व पुढच्या सभेत भाषण करण्यासाठी निघून गेले.

त्या वेळी दहा-बारा वर्षांचे असलेले ; पुढे प्रसिद्ध लेखक म्हणून मान्यता पावलेले लक्ष्मण माने त्या सभेला हजर होते. पुढे १९८० च्या दरम्यान ' उपरा ' या आत्मकथनामुळे त्यांची यशवंतरावांशी ओळख झाली. एकदा त्यांच्याबरोबर गाडीतून प्रवास करताना लक्ष्मण मानेंनी त्यांना दहिवडीच्या त्या सभेची आठवण करून दिली व म्हणाले, ' साहेब, त्यावेळी तुम्हाला विंचवाच्या कळा नव्हत्या का येत ?' इतका जुना प्रसंग लक्षात ठेवल्याबद्दल लक्ष्मण मानेंचे कौतुक करून यशवंतराव म्हणाले, ' अरे, शेवटी तो विंचूच ना ? विष तर चढतच होते. कळाही सुरू होत्या. पण उन्हातान्हातनं आणि लांबवरनं माणसं आली होती. सभा रद्द केली असती, तर त्यांचा केवढा विरस झाला असता ? आणि विंचवानं कोणी मरत नाही. आणखी एक गंमत सांगतो, मी पोटात असताना देवराष्ट्रेत आईला विंचू चावला होता, त्यामुळे मला विंचू फारसा चढत नाही, असं आईनं मला सांगितलं होतं .'

' पण तुम्ही तर चांगलं तास -दीड तास भाषण केलंत.'

' अरे, त्याचं असं आहे, विंचू त्याचं काम करीत होता, मी माझं काम करीत होतो. सभा उधळली जाणं पक्षाला परवडणारं नव्हतं आणि विंचू चढवणारी माणसं जशी असतात, तशी तो उतरवणारी माणसंही असतातच की. राजकारणातही कुणी चढवणारे असतात, कुणी पाडणारे असतात. आपण आपलं काम करीत राहिलं पाहिजे.'