मी टोकाची भूमिका घेऊ शकत नाही !
१९७२ साली पुण्यात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांची जन्मशताब्दी साजरी झाली. या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमासाठी साहेब दिल्लीहून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. केळकरांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी बोलताना साहेब म्हणाले, ' तात्यासाहेब एकांतिक विचाराचे नव्हते. ते व्यवहारी व मध्यममार्गी होते. अशी माणसे टोकाची भूमिका घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना उदंड लोकप्रियता मिळत नाही. अशा माणसांना आपल्या विरोधकाच्या म्हणण्यातही काही तथ्य आहे असे वाटते. आणि म्हणून टोकाची भाषा वापरुन ते टीका करु शकत नाहीत.' खरं तर तात्यासाहेबांविषयी बोलताना यशवंतराव नकळत स्वत:बद्दलच बोलून गेले. कारण वरील वाक्यांचा अनुभव ते स्वत:च घेत होते.
आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेवर आला. यशवंतराव विरोधी पक्षनेते झाले. सरकारने इंदिरा गांधींच्या विरोधात अनेक खटले दाखल केले व चौकशी सुरू केली. याचा परिणाम म्हणजे इंदिरा गांधींनी संसदेबाहेर सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. यशवंतरावांनीसुद्धा संसदेत असाच आक्रमक पवित्रा घ्यावा असे त्यांना वाटत असे, पण संसदेच्या पातळीवरील विरोधाला काही मर्यादा असतात आणि असाव्यात अशी साहेबांची धारणा होती. यशवंतरावांच्या एका मित्राने - ( पत्रकार जयंत लेले ) याविषयी विचारले असता ते म्हणाले, ' मी अनेक सरकारे सांभाळली आहेत आणि म्हणून जनता सरकारमधील एखादा मंत्री जेव्हा काही सांगतो किंवा एखादे विधेयक मांडतो, तेव्हा तो तसे का करतो हे मी समजू शकतो. त्यात सुधारणेला वाव असू शकतो, पण म्हणून त्याचे विधेयक पूर्णपणे झिडकारणे मला गैर वाटते. ही संसदीय वृत्ती नाही.'
' तुमची वृत्ती व राजकीय क्षेत्रातील कार्यपद्धती पाहिल्यास तुम्हाला इंग्लंडसारख्या प्रगत संसदीय लोकशाही असलेल्या देशात वावरणे अधिक सुलभ झाले असते असे वाटून जाते.'
यशवंतराव म्हणाले, ' बरोबर आहे. आपली संसदीय लोकशाही अजून तितकी परिपक्व व्हायची आहे.'