• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-धीर धरा, सुखाने रहा !

धीर धरा, सुखाने रहा  !

एकदा पुणे जिल्ह्यात शिरुरला यशवंतरावांची सभा होती. यशवंतराव येणार असल्याने सभेला प्रचंड गर्दी होती. भाषणाच्या सुरुवातीलाच साहेबांनी श्रोत्यांना जिंकले. ते म्हणाले, ' शिरुर गाव मला नवीन नाही. या गावात मी आठ - पंधरा दिवस राहिलो आहे. बेचाळीसच्या आंदोलनात भूमीगत असताना शिरुरला आम्ही कोठे राहता येईल याचा अंदाज घेण्यासाठी दोन- तीन वेळा रस्त्यावर फेरफटका मारला. एका छोट्याशा घराच्या ओट्यावर शिलाई मशिनवर एक शिंपीदादा काम करीत बसले होते. त्या घरासमोरुन मी दोन - तीन वेळा ये- जा केल्यावर त्यांनी विचारले, ' कोण पाहिजे बाळा तुला ? मग मी त्यांना हळूहळू माझी माहिती सांगितली. त्या ओट्याजवळ मागील बाजूस एक रिकामी खोली होती. शिंपीदादांनी सांगितले, ' आत खोलीत जा. खुशाल रहा. इथे कोणी येणार नाही.' त्या खोलीत मी आठ - दहा दिवस निश्चिंतपणे राहिलो.'

एवढे बोलून यशवंतराव म्हणाले, ' ते शिंपीदादा आता आहेत की कसे, ते मला माहित नाही. असतील तर त्यांची भेट घ्यायला मला आवडेल.' साहेबांनी असे म्हणताच सभेत भिंतीला पाठ लावून बसलेली एक वृद्ध व्यक्ती उभी राहिली आणि म्हणाली, ' मी इथं हाय. जिता हाय.'

सगळी सभा त्या वृद्ध शिंपीदादाकडे बघू लागली. भाषण संपल्यावर साहेब विश्रामगृहावर गेले आणि त्यांनी डोंगरेंना सांगितले, ' सभेत उभा राहून बोलणा-या त्या शिंपीदादाला शोधून काढा आणि घेऊन या. ' डोंगरे रवाना झाले आणि थोड्याच वेळात मोटारीतून शिंपीदादाला सोबत घेऊन आले. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगाही आला होता. यशवंतरावांनी शिंपीदादांची आपुलकीने चौकशी केली. शिंपीदादा म्हणाले, ' आता दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. शिलाई धंदा बंद पडलाय.'

' मुलगा काय करतो ?' साहेबांनी विचारले. ' तो शाळेत जात व्हता. शिलाईधंदा शिकला नाही. नोकरी करावी म्हणतोय, पण आजकाल नोकरी फुकट मिळतीय व्हय ?' त्यावेळी शिरुरचे नगराध्यक्ष साहेबांजवळच बसले होते. त्यांच्याकडे पाहून साहेब म्हणाले, ' या मुलाला सोबत घेऊन जिल्हा परिषदेत जा. त्याला शिपायाची असो अगर दुसरी कुठलीही असो, नोकरी द्यावी असा माझा निरोप सांगा .' मग डोंगरेंना ते म्हणाले, ' यांची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. ' डोंगरेंच्या खिशात तेव्हा चारशे रुपये होते. साहेबांनी ते सगळे पैसे त्या वृद्धाला दिले आणि त्यांचे हात हातात घेवून प्रेमाने म्हणाले, ' धीर धरा, सुखाने रहा.' अडचणीच्या काळात मदत करणा-यांना साहेब कधीच विसरले नाहीत.