न बोलता मदत !
श्री. विठ्ठलराव पाटील हे कराड येथे ग्रंथपाल म्हणून काम करीत होते. १९८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात फुप्फुसाच्या विकाराने ते आजारी पडले. आजार बळावला तेव्हा त्यांना पुण्याच्या रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, शस्त्रक्रिया करावी लागेल. खरं तर शस्त्रक्रियेचा खर्च विठ्ठलरावांच्या आवाक्याबाहेर होता, पण दुसरा पर्याय नव्हता. शेवटी ' पैशांची तरतूद झाल्यावर परत येतो,' असे डॉक्टरांना सांगून ते कराडला आले. पैसे कोठून आणायचे हा एकच प्रश्न त्यांना भेडसावत होता. अचानक त्यांना यशवंतरावांची आठवण झाली. त्यांना पैसे मागावेत काय ? पण यशवंतरावांचा व आपला विशेष परिचय नाही. ते ओळखतील का ? शिवाय ते दिल्लीला राहतात आणि आज ते मंत्री नाहीत तर साधे खासदार आहेत. काय करावे ? शेवटी विठ्ठलरावांनी यशवंतरावांना एक पत्र लिहिले. त्यांच्या आजारासंबंधी व शस्त्रक्रियेसंबंधी माहिती सांगितली व मदतीची अपेक्षा व्यक्त केली आणि दिल्लीच्या पत्त्यावर ते पत्र पाठवून दिले. त्यानंतर काही दिवसांनी रूबी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून विठ्ठलरावांना कराडच्या पत्त्यावर एक पत्र आले. त्यात म्हटले होते की, ' आपल्या शस्त्रक्रियेसाठीच्या खर्चाची तरतूद झाली असून आपण ताबडतोब पुण्याला यावे .'
विठ्ठलरावांचा विशेष परिचय नसताना, केवळ ते आपल्या गावचे आहेत, म्हणून यशवंतरावांनी त्यांना परस्परच मदत केली. याविषयी कोणाजवळही एका शब्दाने ते बोलले नाहीत. खुद्द विठ्ठलरावांनादेखील त्यांनी कधी हे सांगितले नाही. गरजूंना केलेल्या मदतीची जाहिरात करणे हा यशवंतरावांचा स्वभावच नव्हता. आपल्या आयुष्यात अशा प्रकारे हजारो लोकांना त्यांनी मदत केली, पण त्याचा गवगवा कधीच केला नाही.