एका लग्नाची गोष्ट... !
सन १९५३ ची गोष्ट . यशवंतराव तेव्हा मुंबई प्रांताचे पुरवठा मंत्री होते. राज्यातील जनतेला पुरेसा अन्नसाठा उपलब्ध करून देण्याची महत्वाची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागत होती पण याशिवाय अनेक कौटुंबिक जबाबदा-याही आता पूर्ण कराव्या लागत होत्या. यशवंतरावांचे दोन्ही थोरले बंधू ( ज्ञानोबा व गणपतराव ) हयात नसल्याने तेच आता कुटुंबातील कर्ते पुरुष होते. ज्ञानोबादादांची कन्या सुधा आता उपवर झाली होती. यशवंतराव तिच्यासाठी सुयोग्य स्थळ शोधत होते. एकेदिवशी फलटणहून दत्ताजीराव सूर्यवंशी आपल्या प्रतापराव पवार नावाच्या मित्राला घेऊन सुधाला पाहण्यासाठी आले. दत्ताजीराव तसे जुन्या नात्यातलेच होते. कराडला सोमवार पेठेतील यशवंतरावांच्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. यशवंतराव स्वत: या प्रसंगी हजर होते.
' आम्हाला मुलगी पसंत आहे. ' असे दत्ताजीरावांनी सांगितले.
मग देण्याघेण्याच्या संबंधीची चर्चा सुरू झाली. प्रतापरावांनी वरपक्षातर्फे चार हजार रुपये हुंडा मागितला. १९५३ साली चार हजार रुपये ही मोठी रक्कम होती. ( तेव्हा हुंडाविरोधी कायदा अस्तित्वात आला नव्हता ! )
शेजारच्या खोलीत विठामाता बसल्या होत्या. यशवंतरावांनी हुंडा देण्याची तयारी दर्शविली व म्हणाले, ' आमच्या आईला हुंड्यासंबंधी काही सांगू नका, मी तिला लग्न जमल्याचे सांगून येतो.'
मग यशवंतराव उठून विठामातेकडे गेले व म्हणाले,
' आई, सुधाचं लग्न ठरवतोय.'
' कुठं ?' विठामातेचा प्रश्न
' फलटणला.'
' तिला नको देऊस फलटणला. फलटण फार लांब आहे.'
आईचे हे उदगार ऐकून यशवंतरावांना हसू फुटले. ते म्हणाले, ' आई, तुझी धाकटी सून ( वेणूताई ) कुठली आहे ? फलटणचीच ना ? मग फलटण लांब कसे ? शिवाय मुलगा होतकरू व निर्व्यसनी आहे.' अशाप्रकारे विठामातेचे मन वळवून यशवंतरावांनी आईंचा होकार मिळवला. पाहुणे निघून गेले. लग्नात हुंड्याचे चार हजार रुपये कोठून द्यायचे या प्रश्नाने यशवंतराव बेचैन झाले. शेवटी त्यांना एक मार्ग दिसला. त्यांनी आपल्या भाच्याला ( बाबुराव कोतवाल ) बोलावले व म्हणाले,
' हे बघ बाबुराव, आपल्या शुक्रवार पेठेतील घराच्या पाठीमागची मोकळी जागा विकून आपण हुंड्याची व्यवस्था करूया. तू गि-हाईक बघून ती जागा विकून टाक.' यशवंतरावांचा हा आदेश ऐकून बाबुरावला धक्काच बसला. त्याने मनात विचार केला. ' आपला मामा गेली सात वर्षे आमदार आहे. दोन वर्षापासून मंत्री आहे. पण त्याच्याकडे साधे चार हजार रुपये नसावेत ? हुंडा देण्यासाठी जागा विकण्याची वेळ त्यांच्यावर यावी ?' शेवटी त्याने उसनवार करून पैशांची व्यवस्था केली. जागा मात्र विकली नाही. ठरल्याप्रमाणे फलटणच्या राम मंदिरात सुधा आणि दत्ताजीरावांचा विवाह संपन्न झाला. यशवंतरावांनी कन्यादान केले.
आपल्या मंत्रीपदाचा वापर करून यशवंतराव हवे तितके पैसे मिळवू शकले असते, पण तो विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. असे होते यशवंतराव ! अशी होती त्यांची ' श्रीमंती ' !