अजून लोकांची कृपा आहे !
अर्थमंत्री असताना १९७२ साली एका परिषदेत भाग घेण्यासाठी यशवंतराव लंडनला गेले होते. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ज्यांच्या विरोधात आपण लढलो त्या इंग्रजांच्या भूमीला एका स्वतंत्र देशाचा मंत्री म्हणून भेट देताना यशवंतरावांना विशेष आनंद वाटत होता. गंमत म्हणजे ज्यांनी यशवंतरावांना शोधण्यासाठी बक्षिस जाहिर केले होते, त्यांनीच खास निमंत्रण देऊन त्यांना परिषदेसाठी बोलावले होते. परिषदेच्या आदल्या दिवशी सर्व निमंत्रितांसाठी खास मेजवानी आयोजित केली होती. या भोजन समारंभात यशवंतरावांच्या शेजारी इंग्लंडच्या अर्थखात्याचे राज्यमंत्री मि. नॉफ बसले होते. यशवंतराव भारताचे प्रतिनिधी म्हणून परिषदेत आले आहेत हे कळल्यावर नॉफ काहीसे अवघडले. त्यांच्या पूर्वजांनी भारतातील ब्रिटीश सैन्यात अधिकारी म्हणून काम केले होते. भारतीयांवर जुलूम करण्यात आपल्या कुटुंबाचा प्रत्यक्ष सहभाग होता या भावनेने त्यांना अपराधी वाटत होते. त्यांच्या या अवघडलेपणाचे कारण कळाल्यावर यशवंतराव म्हणाले, ' मि. नॉफ , तो इतिहास आता जुना झाला आहे. आज तशी वैयक्तिक कटुता आमच्या मनात राहिलेली नाही. ' मग नॉफ साहेबांची कळी खुलली. दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. नॉफ यांच्या मतदारसंघात साठ हजार मतदार होते.' माझ्या मतदार संघात सहा ते सात लाख लोक आहेत असे यशवंतरावांनी सांगितल्यावर नॉफ यांना आश्चर्याचा एवढा मोठा धक्का बसला की काही वेळ त्यांना बोलताच येईना.
' एवढेच नाही तर तुमच्याप्रमाणे आमचे मतदारसंघ राजधानीच्या आसपास नाहीत. माझा मतदारसंघ दिल्लीपासून एक हजार मैल दूर आहे.' यशवंतरावांनी नॉफना माहिती पुरवली.
' अहो मग एवढ्या मोठ्या मतदारसंघाशी तुम्ही कसा संपर्क ठेवता ? मंत्रीपदावर असताना जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा तुम्ही कसा करता आणि मुळात तुम्हाला निवडून येणे कसे जमते ?' नॉफनी विचारले.' अजून लोकांची कृपा आहे म्हणून जमते ! ' यशवंतराव हसून म्हणाले.