... म्हणून त्या वाटेला आम्ही जात नाही !
यशवंतराव हे उत्कृष्ट संसदपटू होते. सभागृहातील त्यांची भाषणे याची साक्ष देतात. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनकाळात आचार्य अत्रेंच्या वाणीचा आणि लेखणीचा वारू चौफेर उधळला होता. विधीमंडळात हा वारू रोखण्याचे काम यशवंतरावांनी अनेकदा केले. अत्रेंच्या संपादनाखाली निघणा-या ' मराठा ' दैनिकाची पाने सरकारवरील टीकेने भरून वहात असत. आपल्या धारदार लेखणीने त्यांनी सरकारला पुरते घायाळ केले होते. साहजिकच ' मराठा ' दैनिकाला सरकारकडून फारशा जाहिराती मिळत नव्हत्या. यासंदर्भात २८ जून १९६२ रोजी आचार्य अत्रेंनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला की ' महाराष्ट्र सरकार विविध वृत्तपत्रांत ज्या जाहिराती देत असते त्या देताना कोणते निकष लावले जातात हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. ' अत्र्यांच्या प्रश्नाचा रोख यशवंतरावांच्या लगेच लक्षात आला. उत्तरादाखल केलेल्या भाषणात ते म्हणाले, ' जाहिराती देण्याच्या बाबतीत एक अॅप्रूव्हड लिस्ट ( मान्यता यादी ) आहे यात शंका नाही. एखाद्या वर्तमानपत्रात जाहिराती देताना आम्ही त्या वर्तमानपत्राचा खप, त्याचा वाचकवर्ग आणि संबंधित वर्तमानपत्राचा दृष्टिकोन कितपत वास्तवववादी आहे या गोष्टींचा विचार करतो. केवळ निंदाव्यंजक मजकूर छापणारे, कुचेष्टा करणारे ते वर्तमानपत्र नाही ना ? याचाही विचार जाहिराती देताना केला जातो.' शेवटचे वाक्य अर्थातच ' मराठा ' दैनिकाला उद्देशून होते.
यावर उठून अत्र्यांनी आणखी एक सूचना मांडली की आम्ही ज्या गोष्टी वर्तमानपत्रात छापतो त्या जोपर्यंत सरकारकडून फेटाळल्या जात नाहीत तोपर्यंत त्या ख-याच आहेत असे मानले गेले पाहिजे . खोट्या बातम्या छापल्या तर त्या फेटाळण्याचा अधिकार सरकारला आहेच.
या सूचनेवर यशवंतरावांनी फार मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, ' आम्ही शक्यतो शहानिशा करण्याचा प्रयत्न करीत असतो, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. ' मराठा ' मधील किती बातम्या आम्ही दुरुस्त करणार ? म्हणून त्या वाटेला आम्ही जात नाही. ' सभागृहात हशा पिकला. यशवंतराव पुढे म्हणाले, ' याचा अर्थ ते जे लिहितात ते सगळेच खोटे असते असे मी म्हणत नाही. ' व थोडे थांबून पुढे मिश्किलपणे म्हणाले, ' कधी कधी ते खरेही असते ! ' या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला व अत्र्यांसह सगळे सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.