विद्वानांचा विनम्र सत्कार
यशवंतराव मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. सातारा येथे त्यांच्या हस्ते वयोवृद्ध विद्वानांचा सत्कार आयोजित केलेला होता. अनेक विद्वान जमले होते. समारंभ सुरू व्हायला अवकाश होता. सत्कारमूर्ती विद्वान मंडळी गप्पा मारीत होते. टिंगलटवाळीच्या स्वरूपात सवंग भाष्य चालू होते. एक विद्वान म्हणाले, ' चव्हाणांना केवळ जातीच्या जोरावर मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यांचा विद्वत्तेशी काय संबंध ?' दुसरे विद्वान म्हणाले, ' अशा माणसाच्या हस्ते आपला सत्कार म्हणजे एकप्रकारे विद्वत्तेची चेष्टाच आहे.'
थोड्याच वेळात यशवंतराव आले. समारंभ सुरू झाला. विद्वानांचा सत्कार आता होणार होता. समारंभाचे सूत्रसंचालन करणा-याने सूचना दिली की नावे जाहीर होतील त्याप्रमाणे संबंधित विद्वानांनी आपला सत्कार स्वीकारावा. ही सूचना संपताच यशवंतराव लगेच उठले आणि त्यांनी माईकवरून सांगितले,' कृपया विद्वानांनी आपापल्या जागेवरच थांबावे. मीच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना सन्मान प्रदान करीन.' त्याप्रमाणे यशवंतरावांनी अतिशय विनम्रपणे जागेवर जाऊन सर्व विद्वानांचा यथोचित गौरव केला आणि त्यानंतर सुमारे वीस मिनिटे विद्वान आणि विद्वत्तेविषयी इतके उत्कृष्ट भाषण केले की टिंगल टवाळी करणारे तथाकथित शहाणे सर्दच झाले. यशवंतरावांची उंची त्यांच्या लक्षात आली आणि त्यांना ती मान्यही करावी लागली.