शिक्षकांचा सन्मान राखा !
सन १९४५ मध्ये कराड येथील श्री. कळंबेकर व इतर सहका-यांनी एकत्र येऊन श्री. शिवाजी शिक्षणसंस्थेची स्थापना केली. संस्थेच्या वतीने १९५८ साली कराड येथे सायन्स कॉलेज सुरू करण्यात आले. या कॉलेजच्या नवीन भव्य इमारतीचे उदघाटन १९६० साली तत्कालिन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते होणार होते. यशवंतराव संस्थेचे अध्वर्यू असल्याने त्यांनीच हा योग जुळवून आणला होता. त्यावेळी डॉ. आर. डी. शिंगटे हे महाविद्यालयाचे प्राचार्य होते. कराड शहरात राष्ट्रपतींनी येण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे प्रचंड गर्दी जमणार हे गृहित धरूनच समारंभाची तयारी चालू होती. कॉलेजचे व संस्थेचे लोक अहोरात्र झटत होते. उदघाटन समारंभाच्या कार्यक्रमात प्राचार्यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. उदघाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर कॉलेज प्राचार्यांच्या ताब्यात सुपूर्त होते, या भावनेने व्यवस्थापनाने त्यांचा कार्यक्रमपत्रिकेत समावेश केला नव्हता, याची माहिती प्राचार्यांना होती आणि त्याबद्दल त्यांची काही तक्रारही नव्हती.
समारंभाच्या आदल्या दिवशी यशवंतराव मुंबईवरून आले. संध्याकाळी कॉलेजवर येऊन सर्व व्यवस्था तपशीलवार तपासून ती ठीक असल्याची खात्री करून ते सर्कीट हाऊसवर गेले. रात्री उशिरा उद्याच्या समारंभासाठी तयार केलेल्या कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकल्यावर त्यात प्राचार्यांचा समावेश नाही, ही गोष्ट त्यांना खटकली. त्यांनी ताबडतोब एका माणसाला प्राचार्यांकडे पाठवले. रात्री अकरा वाजता तो माणूस प्राचार्यांकडे गेला आणि ' उद्याच्या कार्यक्रमात तुम्ही पाच मिनिटे प्रास्ताविक भाषण करावे ' असा यशवंतरावांचा निरोप आहे, हे सांगितले. यशवंतरावांनी आपली दखल घेतली या जाणिवेने प्राचार्यांचा ऊर भरून आला.
शिक्षकांना सन्मानाने वागवले पाहिजे असा यशवंतरावांचा कटाक्ष होता व प्रत्येक व्यक्तीला ' तुला मानाचे स्थान आहे ' याची जाणीव प्रत्यक्ष कृतीने करून देण्याची त्यांची कार्यपद्धती होती.