विचारस्वातंत्र्याचा आदर
सन १९७५ साली कराडला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले गेले होते. त्यावेळची परिस्थिती मोठी विचित्र होती. देशात आणीबाणी चालू होती. आणीबाणीला प्रखर विरोध करणा-या दुर्गा भागवत या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या आणि स्वागताध्यक्ष होते यशवंतराव चव्हाण. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार होते. दुर्गाताई आणि लक्ष्मणशास्त्री जोशी आणीबाणीच्या विरोधात होते आणि यशवंतराव आणीबाणी जाहीर करणा-या सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री होते. अशा परिस्थितीत हे संमेलन अयशस्वी होईल असेच अनेकांना वाटत होते. सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. काही अनुचित घडू नये यासाठी प्रयत्नशील होते. तर्कतीर्थांनी त्यांचे उदघाटनाचे भाषण लिहून आणले होते. आणीबाणीत काही गोष्टी बदलल्या पाहिजेत, असे विचार त्यांनी त्यात मांडले होते. तर्कतीर्थांच्या भाषणातील तो भाग वृत्तपत्रात कोठेही येऊ नये असे आदेश निघाले. तर्कतीर्थांच्या भाषण सुरू होण्यापूर्वी किसन वीर मंचकावर गेले व तर्कतीर्थांना हळूच म्हणाले, ' आणीबाणीवर तुमच्या भाषणात जी टीका आहे, ती काढता येणार नाही का ?'
तर्कतीर्थ म्हणाले, ' नाही !'
किसन वीर नाराज होऊन यशवंतरावांकडे गेले आणि म्हणाले , ' शास्त्री माझे ऐकत नाहीत . तुम्ही त्यांना सांगता का ?'
यशवंतराव म्हणाले, ' मी शास्त्रीजींना सांगू शकत नाही. त्यांचे भाषण आपण बंद करू शकत नाही.'
किसन वीरांसह अनेक कार्यकर्ते नाराज झाले, पण त्यांची नाराजी ओढवूनसुद्धा यशवंतरावांनी विचारस्वातंत्र्याचा आदर केला. स्वत: तर्कतीर्थांनीच ही आठवण सांगितली आहे.