• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- महिलांना संरक्षण द्या... !

महिलांना संरक्षण द्या... !

सन १९५३ सालची गोष्ट. कोल्हापुरात कमलाबाई काळे नावाच्या समाजसेविका राहात होत्या. समाजकार्याची आवड असल्याने त्यावेळी स्थापन झालेल्या रेशनिंग सल्लागार समितीच्या त्या सदस्या होत्या. काळेबाईंच्या कमिटीचे काम चांगले चालले होते. जिल्हाधिका-यांनी या समितीला विशेष अधिकार दिले होते. यशवंतराव तेव्हा पुरवठामंत्री होते.

एकदा कोल्हापूरच्या दौ-यावर असताना यशवंतरावांच्या अध्यक्षतेखाली समितीची मीटिंग झाली. तिथे कमलाताईंना पाहिल्यावर यशवंतराव म्हणाले, ' तुम्ही फारच चांगले काम करता असे माझ्या कानावर आले आहे. त्याबद्दल सर्व आमदार व खासदारांच्या वतीने मी आपले अभिनंदन करतो ' आणि रत्नाप्पा कुंभार यांच्याकडे वळून साहेब म्हणाले, ' काय अण्णा, एवढ्या हुषार बाई तुमच्या कोल्हापुरात असताना त्यांना तुम्ही अजून काँग्रेसचे सभासद करून घेतले नाही का ?' एवढे बोलून त्यांनी खिशातून चार आण्याचे नाणे काढले व म्हणाले, ' ही घ्या त्यांची सभासद वर्गणी. कमलाबाईंना सभासद करून घ्या. '

पुढे १९५६ साली कमलाताई मुंबईला जाऊन कापडी बाहुल्या बनविण्याचा कोर्स पूर्ण करून आल्या. यशवंतराव तोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. एकदा पुण्यात ते आले असता तेथील कार्यकर्त्यांनी त्यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढली होती. यशवतंराव जनतेला अभिवादन करीत होते, इतक्यात त्यांचे लक्ष कमलाताईंकडे गेले. त्या खडकवासल्याला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभ्या होत्या. इतक्या गर्दीतून यशवंतरावांनी कमलाताईंना ओळखले व सुहास्य वदनाने हात हलवला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीला एवढ्या गर्दीत ओळख द्यावी याचे कमलाताईंना प्रचंड आश्चर्य वाटले. सहा वर्षांपूर्वी केवळ अर्ध्या तासासाठी झालेली भेट यशवंतरावांच्या अजून लक्षात होती . त्यांच्या स्मरणशक्तीने व आपुलकीने त्या इतक्या प्रभावित झाल्या की त्याच दिवशी त्या यशवंतरावांना भेटण्यासाठी सर्किट हाऊसवर गेल्या. त्यांना पाहताच यशवंतराव म्हणाले, ' कमलाताई तुम्ही इथं कशा ? मी तर तुम्हाला बसस्टॉपवर पाहिले.' यावर कमलाताई म्हणाल्या, ' साहेब , आपण एवढे मोठे झालात, तरीसुद्धा माझ्यासारख्या एका सामान्य महिलेची ओळख ठेवता याचा मला खूप आनंद झाला आणि केवळ तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. आम्ही खडकवासल्याला ग्रामीण महिलांना बाहुल्या बनविण्याचे प्रशिक्षण देणारे केंद्र काढले आहे. त्याला तुमचा आशीर्वाद हवा आहे. उद्या पानशेतहून येताना खडकवासल्याला भेट द्यावी एवढीच इच्छा आहे. '

यावर यशवंतराव म्हणाले, ' म्हणजे तुम्ही राजकारण सोडून बाहुल्या खेळायला लागलात की काय ? छान आहे, मी जरूर येईन.'

दुसरे दिवशी यशवंतराव त्या प्रशिक्षण केंद्राच्या उदघाटनाला गेले. तिथे जमलेल्या लोकांसमोर त्यांनी छोटेसे भाषणही केले. आपल्या भाषणात कमलाताईंची स्तुती करून ते म्हणाले, ' लोकहो, तुमच्या नशिबाने चुकून राजकारणातल्या बाई तुमच्या गावाला आल्या आहेत. त्या आपल्याच आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेचा फायदा करून घ्या. त्यांना संरक्षण द्या.'

यशवंतरावांच्या या प्रेरक शब्दांनी कमलाताईंना हत्तीचे बळ मिळाले. त्या अधिक जोमाने कामाला लागल्या व त्या भागातील लोक त्यांना आपले मानू लागले.